पत्नी व तिच्या विद्यार्थ्यांना मारून माथेफिरूची आत्महत्या

वृत्तसंस्था
मंगळवार, 11 एप्रिल 2017

माथेफिरूने सार्वजनिक ठिकाणी गोळीबार करण्याचे प्रकार अमेरिकेत वारंवार घडत असल्याचे समोर आले आहे.

सॅक्रामेंटो : एका मोथेफिरूने कॅलिफोर्नियातील शाळेत केलेल्या गोळीबारात एका शिक्षिकेसह दोनजण मृत्युमुखी पडले आहेत. या गोळीबारात एक विद्यार्थी जखमी झाला आहे. माथेफिरूंनी सार्वजनिक ठिकाणी गोळीबार करण्याचे प्रकार अमेरिकेत वारंवार घडत असल्याचे समोर आले आहे. कॅलिफोर्नियात पुन्हा एकदा अशी घटना घडली आहे. 

या शाळेत शिक्षिका असणाऱ्या पत्नीचा खून करण्याच्या उद्देशाने एका माथेफिरूने शाळेच्या परिसरात अंदाधुंद गोळीबार केला. पत्नीला मारल्यानंतर स्वतःवर गोळी झाडून घेत त्याने आत्महत्या केली. 

कॅरेन स्मिथ या येथील शाळेत शिकवणाऱ्या शिक्षिकेचे नाव असून, त्यांचा विवाह सेड्रीक अँडरसन याच्याशी झाला होता. महिनाभरापूर्वीच ते विभक्त झाले होते. अँडरसन याने त्यांच्या शाळेत जाऊन पूर्ववैमनस्यातून सूडभावनेने गोळीबार केला. पत्नीला काही सामान द्यायचे आहे असे सांगत त्याने शाळेत प्रवेश मिळवला. शाळेत स्मिथ शिकवत असलेल्या वर्गात अँडरसन पोचला आणि बंदूक काढून पत्नी स्मिथवर गोळी झाडली. या गोळीबारात स्मिथ यांच्याजवळ थांबलेले दोन विद्यार्थीही गंभीर जखमी झाले. 

या घटनेनंतर स्मिथ आणि दोन्ही विद्यार्थ्यांना उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान स्मिथ आणि आठ वर्षांच्या एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. दुसऱ्या ९ वर्षीय जखमी विद्यार्थ्यावर उपचार सुरू आहेत.