चीनच्या सैन्याची संख्या 10 लाखांपर्यंत घटविणार...

पीटीआय
बुधवार, 12 जुलै 2017

याआधी देशांतर्गत सुरक्षा व जमिनीवरील युद्ध, हा पीएलएच्या प्राधान्यक्रमावरील विषय होता. आता या उद्दिष्टांत आता मुलभूत बदल करण्यात येत आहेत

बीजिंग - जगातील सर्वाधिक सैन्य असलेल्या चीनने "पीपल्स लिबरेशन आर्मी'ची संख्या 10 लाखांपर्यंत कमी करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याचे वृत्त "पीएलए डेली' या चिनी सैन्याच्या औपचारिक वृत्तपत्राने दिले आहे. या सैन्याची संख्या सध्या सुमारे 23 लाख इतकी आहे. या सैन्यामध्ये "संरचनात्मक सुधारणा' घडविण्यासाठी चीन प्रयत्नशील आहे. या पार्श्‍वभूमीवर, हा निर्णय घेण्यात आला आहे.

"चीनकडून आखण्यात आलेली व्यूहात्मक उद्दिष्टे व सुरक्षाविषयक गरजा डोळ्यांसमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आला. याआधी देशांतर्गत सुरक्षा व जमिनीवरील युद्ध, हा पीएलएच्या प्राधान्यक्रमावरील विषय होता. आता या उद्दिष्टांत आता मुलभूत बदल करण्यात येत आहेत. पीएलएची संख्या 10 लाखांपर्यंत कमी करण्याचा निर्णय हा अशा स्वरुपाचा घेण्यात आलेला पहिलाच निर्णय आहे,'' असे यासंदर्भात प्रसिद्ध झालेल्या लेखामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

दक्षिण चिनी समुद्रामधील सध्याची तणावपूर्ण परिस्थिती; तसेच जागतिक राजकारणात चीनच्या आक्रमक धोरणाविषयी इतरत्रही उमटत असलेल्या प्रतिक्रियांच्या पार्श्‍वभूमीवर चीनकडून घेण्यात आलेला हा निर्णय अत्यंत संवेदनशील मानण्यात येत आहे.