चीनच्या नकाराचा परिणाम नाही: परराष्ट्र मंत्रालयाचे स्पष्टीकरण

पीटीआय
शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2017

चीनचा विरोध असला तरी मसूद अझरबाबत जागतिक मतैक्‍य करण्याच्या आमच्या प्रयत्नांत बाधा येणार नाही. भारत समविचारी देशांच्या सहकार्याने दहशतवादविरोधी लढा सुरू ठेवेल. चीनच्या भूमिकेचा त्यावर काही परिणाम होणार नाही

नवी दिल्ली - पाकिस्तानस्थित "जैश ए महंमद'चा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्‍या मसूद अझर याला संयुक्त राष्ट्रसंघाने जागतिक दहशतवादी जाहीर करण्यात चीनने खो घातला असला तरी त्यामुळे भारताच्या दहशतवादविरोधी लढ्यावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने आज स्पष्ट केले.

तसेच वादग्रस्त मुस्लिम धर्मप्रचारक झाकीर नाईकला ताब्यात देण्याबाबत सरकार लवकरच मलेशिया सरकारला विनंती करणार असल्याचेही मंत्रालयाने सांगितले.
पत्रकारांशी बोलताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार म्हणाले,""चीनचा विरोध असला तरी मसूद अझरबाबत जागतिक मतैक्‍य करण्याच्या आमच्या प्रयत्नांत बाधा येणार नाही. भारत समविचारी देशांच्या सहकार्याने दहशतवादविरोधी लढा सुरू ठेवेल. चीनच्या भूमिकेचा त्यावर काही परिणाम होणार नाही.''

पठाणकोट हल्ल्यामागचा सूत्रधार मसूद अझरला जागतिक दहशतवादी ठरविण्याच्या भारताच्या प्रयत्नांना चीनने काल चौथ्यांदा खो घातला आहे. राष्ट्रसंघाच्या बंदी घालणाऱ्या समितीच्या सदस्यांत याबाबत मतैक्‍य नसल्याचे कारण चीनने दिले आहे. भारताच्या मागणीला अमेरिकेने पाठिंबा दिला आहे. मात्र, याबाबत चीन सतत नकाराधिकाराचा वापर करीत आला आहे.

Web Title: china india