मारले गेलेले चिनी नागरिक धर्मोपदेशक असल्याचा दावा

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 जून 2017

विदेशी नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची असली तरी या नागरिकांनीही नियमांचे पालन करणे आवश्‍यक असल्याचे या मंत्र्याने म्हटले आहे. दरम्यान, हे दोघे नागरिक दक्षिण कोरियाच्या धर्मोपदेशकामुळे मारले गेल्याचा आरोप चीनने केला आहे

इस्लामाबाद - बलुचिस्तानमध्ये दहशतवाद्यांनी हत्या केलेले दोन्ही चिनी नागरिक हे व्यावसायिक व्हिसा घेऊन धर्मोपदेश करत होते, असा दावा पाकिस्तान सरकारने केला आहे. हे दोघे जण उर्दू शिकण्याच्या नावाखाली लोकांची दिशाभूल करत असल्याचे पाकिस्तान सरकारमधील एका मंत्र्याने सांगितले.

विदेशी नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची असली तरी या नागरिकांनीही नियमांचे पालन करणे आवश्‍यक असल्याचे या मंत्र्याने म्हटले आहे. दरम्यान, हे दोघे नागरिक दक्षिण कोरियाच्या धर्मोपदेशकामुळे मारले गेल्याचा आरोप चीनने केला आहे. पाकिस्तान आणि चीनची मैत्री पोलादासारखी मजबूत असून, या घटनेवरून आमच्यात वाद झाल्याचे वृत्त खोडसाळपणाचे असल्याचे सांगत चीनने भारतीय माध्यमांवरही टीका केली आहे. पाकिस्तानमध्ये मारले गेलेले दोन्ही चिनी नागरिक दक्षिण कोरियाच्या धर्मोपदेशकाबरोबर काम करत होते.