पेंग्वीनची अनोखी प्रेमकथा

मानस पगार
सोमवार, 6 मार्च 2017

मे २०११ मध्ये समुद्रात अव्याहत सुरु असलेल्या तेल उत्खननाची परिणीती तेल गळतीत होऊन पंखांवर तेलाचा तवंग चढल्याने पोहोण्यास असमर्थ ठरलेला म्यागेल्यानीक जातीचा आजारी पेंग्वीन पक्षी समुद्री लाटांनी रिओ डी जानेरो मधल्या प्रोवेटा समुद्रतटावर गेला. जखमी, अशक्त अवस्थेतला हा असहाय पेंग्वीन निवृत्त झालेले स्थानिक गवंडी जो परेरा डिसुझा (७२) ह्यांना आढळला.

लाखो लेखक आणि कोट्यवधी कवींनी जगात प्रेमाच्या व्याख्या मांडल्या. रोमिओ- ज्यूलियेट, लैला-मजनू अशा अनेक रंजक प्रेम कथांमधून प्रत्येकजण आपापल्या प्रेमाची परिभाषा शोधत असतो. पण जगातील एका दूरवरच्या कोपऱ्यात एका अनोख्या प्रेमकथेने जन्म घेतला आणि उत्तुंग प्रेमाची सर्वोच्च परिभाषा तयार केली. हि घटना आहे दक्षिण अमेरीका खंडातील ब्राझीलच्या एका समुद्रकिनाऱ्यावरची!

मे २०११ मध्ये समुद्रात अव्याहत सुरु असलेल्या तेल उत्खननाची परिणीती तेल गळतीत होऊन पंखांवर तेलाचा तवंग चढल्याने पोहोण्यास असमर्थ ठरलेला म्यागेल्यानीक जातीचा आजारी पेंग्वीन पक्षी समुद्री लाटांनी रिओ डी जानेरो मधल्या प्रोवेटा समुद्रतटावर गेला. जखमी, अशक्त अवस्थेतला हा असहाय पेंग्वीन निवृत्त झालेले स्थानिक गवंडी जो परेरा डिसुझा (७२) ह्यांना आढळला. त्यांनी त्याच्या पंखांवरचा तेलाचा थर साफ करून त्याला जवळच असलेल्या आपल्या घरी घेऊन गेले. त्याची शुश्रूषा करून मासे वगैरे खाऊ घातले. हळू हळू पेंग्वीनही सकारात्मक प्रतिसाद देत होता. थोड्याच दिवसात तो ठणठणीत बरा होऊन आजूबाजूला बागडू लागला. डिसुझा यांचा २ वर्षांचा नातू 'पिंग्विम' (पोर्तुगीजमध्ये पेंग्वीनसाठी संबोधले जाते) आपल्या बोबड्या स्वरात 'डिंडीम' म्हणून हाक मारायचा, यानंतर त्या पेंगवीनचे तेच नामकरण झाले. त्यांचा पाहुणचार घेत डिंडीम तब्बल ९ महिने तिथे थांबला आणि फेब्रुवारी २०१२ मध्ये आपल्या भागात परतला.

पेंग्वीन पक्षी हे आपले जोडीदार, पुनरुत्पादनची ठिकाणे यासोबत एकनिष्ठ राहतात. सुमारे चार महिन्यांनी जूनमध्ये तो पुन्हा प्रोवेटा बीचवर परतून डिसुझा यांच्या घरासमोर येऊन जोरजोरात चित्कारात त्यांना आपण आल्याची वर्दी दिली. त्याला परतलेला बघून डिसुझांना सुखद धक्का बसला. उपकारकर्त्याला 'डिंडीम' विसरला नसल्याची ती पावती होती! त्या कुटुंबासोबत काही काळ मजेत घालवून तब्बल ५००० मैल दूर असलेल्या पॅटागोनिया भागात असलेल्या आपल्या घरी जाण्यासाठी डिंडीमने फेब्रुवारीत पुनःश्च प्रयाण केले. तेव्हापासून आजतागायत कुठलाही खंड न पडू देता तो आपल्या जिवनदात्याला न चुकता दरवर्षी भेटायला येत आहे. डिंडीमला डिसुझा आपल्या घरात आंघोळ घालतात, हातांनी त्याच्या चोचीत अन्न भरवतात आणि ही जवळीक साधण्याची सूट फक्त त्यांनाच आहे बाकीच्यांनी प्रयत्न जरी केला तर डिंडीम जोरात चोच मारून दूर राहण्यास सुचवतो.

ब्राझीलमधल्या उबटुबा मत्सालयातील संशोधकांनी डिंडीमचा अभ्यास करण्यासाठी त्याला टॅग लावून त्याच्या रक्ताचे नमुने देखील घेत संशोधन सुरू केले आहे. डिंडीमच्या स्टोरीची दखल पाश्चात्य देशांतील तमाम वृत्तसंस्थांनी घेतली आहे. डिंडीम हा म्यागेल्यानीक जातीचा सुमारे ७ वर्षीय पेंग्वीन आहे. या जातीला हे नाव पोतुगीज खलाशी फर्डिनांड म्यागेलानवरून पडलेले आहे. १५२० मध्ये या पक्ष्यांना त्याने पहिल्यांदा बघितले होते. 

सध्या वाढत्या तेल उत्खननामुळे ब्राझील, चिली, अर्जेंटिना या दक्षिण अमेरीकेतील देशांचे समुद्र तट झपाट्याने प्रदूषित होत आहे. क्रूड ऑईलच्या तवंगामुळे सागरी जीव, पर्यावरण धोक्यात येत आहेत. साधारणपणे दरवर्षी २० हजार प्रौढ, तर २२ हजार छोटे पेंगवीन तेलामुळे मृत्युमुखी पडत आहे. IUCN (international union for conservation nature) ह्या वैश्विक संस्थेच्या निरीक्षणांनुसार आता डिंडीमची प्रजाती धोक्याच्या उंबरठ्यावर असून परिस्थिती अशीच राहिली तर लवकरच नष्टप्राय होऊ शकते.

मुका डिंडीम आणि डिसुझा यांची निर्व्याज मैत्रीची खरीखुरी गोष्ट मात्र जगभर पसरत आहे. प्राणी आणि मानवाच्या इतिहासात अबोल मैत्रीचा हा बोलका दीपस्तंभ मात्र काळाच्या ओघात नष्टप्राय होण्यासारखा नाही. 

 

Web Title: Dindim Penguin swims 5000km to meet him