ट्रम्प प्रशासनाचा भारताला 'NSG'साठी पाठिंबा

वृत्तसंस्था
गुरुवार, 16 मार्च 2017

जॉर्ज बुश यांनी चिनी नेत्यांपुढे भारताच्या सदस्यत्वाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्याप्रमाणे स्वतः अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीनपुढे हा मुद्दा मांडणार का याबाबत उत्सुकता आहे. 

वॉशिंग्टन : भारत अणुऊर्जा पुरवठादार गटाचा (NSG) सदस्य बनावा यासाठी अमेरिका भारत आणि इतर सदस्य देशांसोबत वाटाघाटी करीत आहे, असे अमेरिकेने म्हटले आहे. NSG संदर्भात अमेरिकेचे भारतासंबंधीचे धोरण ट्रम्प प्रशासनाने कायम ठेवले असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. 

"अण्वस्त्र निर्मितीसाठी वापरली जाणारे साहित्य, तंत्रज्ञान यांची निर्यात करणाऱ्या या बहुराष्ट्रीय गटाच्या पूर्ण सदस्यत्वासाठी अमेरिकेचा भारताला पाठिंबा आहे," असे अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्याने 'पीटीआय'शी बोलताना सांगितले. 

सध्या 48 देश NSG चे सदस्य आहेत. या गटाचे सदस्य होण्याच्या भारताच्या प्रयत्नांबाबत ट्रम्प प्रशासनाची भूमिका काय आहे याबाबत विचारले असता परराष्ट्र खात्याकडून पाठिंबा असल्याचे सांगण्यात आले. 
जॉर्ज डब्लू. बुश अमेरिकेचे अध्यक्ष होते तेव्हापासून अमेरिका आणि भारत यांच्यादरम्यान याबाबत वाटाघाटी सुरू आहेत. ओबामा प्रशासनाने सर्वतोपरी प्रयत्न करूनही चीनच्या विरोधामुळे हे साध्य होऊ शकले नाही. आता हे काम ट्रम्प प्रशासनाकडे आले आहे. 

"सदस्यत्वासाठी भारताचे प्रकरण पुढे सरकावे यासाठी आम्ही काम केले आहे आणि अद्याप भारत व NSG सदस्य राष्ट्रांच्या समपदस्थ अधिकाऱ्यांशी जवळून काम करीत आहोत," अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने स्पष्ट केले. 
दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री रेक्स टिलर्सन हे या आठवड्यात चीन दौऱ्यावर जाणार आहेत. ते चिनी नेत्यांशी भारताच्या सदस्यत्वाबद्दल बोलणार का हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. यापूर्वी, जॉर्ज बुश यांनी चिनी नेत्यांपुढे भारताच्या सदस्यत्वाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्याप्रमाणे स्वतः अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीनपुढे हा मुद्दा मांडणार का याबाबत उत्सुकता आहे.