अमेरिका फर्स्ट!; अध्यक्ष ट्रम्प यांची घोषणा

Donald Trump, Melania Trump
Donald Trump, Melania Trump

वॉशिंग्टन - "अमेरिकेमध्ये पुन्हा एकदा जनतेचे सरकार आले आहे. यापुढे अमेरिकेमध्ये "अमेरिका फर्स्ट' या नव्या दृष्टिकोनातून सरकार चालविले जाईल आणि आपण सर्वजण मिळून अमेरिकेला पुन्हा एकदा महान बनवू,' असे सांगत डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील सर्वांत शक्तिमान देशाचे अध्यक्षपद आज स्वीकारले. अमेरिकेचे सरन्यायाधीश जॉन रॉबट्‌स यांनी ट्रम्प यांना अमेरिकेचे 45 वे अध्यक्ष म्हणून शपथ दिली आणि "ट्रम्पयुगा'ला सुरवात झाली. 

अनेक वाद आणि नागरिकांची निदर्शने या पार्श्‍वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी झाला. शपथविधी समारंभात माइक पेन्स यांनी आधी उपाध्यक्षपदाची शपथ घेतली, त्यानंतर ट्रम्प यांनी शपथ घेतली. कॅपिटॉल येथे झालेल्या या शपथविधीला लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता. शपथविधीनंतर ट्रम्प यांनी जनतेला संबोधित केले. माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या कारकिर्दीचे कौतुक करत आणि त्यांचे आभार मानत त्यांनी भाषणाला सुरवात केली. ते म्हणाले, ""एका प्रशासनाकडून दुसऱ्या प्रशासनाकडे अथवा एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षाकडे झालेले हे सत्तांतर नाही. नेत्यांकडून जनतेकडे असे हे सत्तांतर आहे. हा देश तुमचाच असल्याने अमेरिकेवर आजपासून जनतेचे राज्य आहे. आपल्यासमोर अनेक आव्हाने आहेत. मात्र, एकत्र येत आपण सर्व आव्हानांचा सामना करू. अमेरिकी नागरिकांच्या अनेक समस्यांकडे आतापर्यंत दुर्लक्ष झाले.

नोकऱ्यांसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी त्यांनी मोठा संघर्ष केला. आपण इतर देशांचे संरक्षण केले, दुसऱ्यांवर अब्जावधी डॉलर खर्च करून त्यांना श्रीमंत केले; पण याकाळात स्वतःकडे दुर्लक्ष झाल्याने अमेरिकेतील अनेक उद्योग बंद पडले, अनेक जण बेरोजगार झाले. मात्र, आता हा इतिहास झाला आहे. यापुढे "अमेरिका फर्स्ट' या नव्या दृष्टीने सरकार काम करेल. प्रत्येक क्षेत्रातील महत्त्वाचा निर्णय घेताना याचे भान राखले जाईल. मी तुमच्यासाठी लढेन आणि तुमची मान कधीही खाली जाऊ देणार नाही.'' 

समोर आव्हाने असतानाही नवी मोठी स्वप्ने पाहण्याचे नागरिकांना आवाहन करतानाच ट्रम्प यांनी सर्वांना एकसंध राहण्याची विनंती केली. एकत्र असल्यास अमेरिकेला थोपविण्याची कोणाचीही ताकद नाही, असा विश्‍वास त्यांनी जनतेला दिला. आतापर्यंतच्या राजकारण्यांनी केवळ पोकळ आश्‍वासने दिली असून यापुढे केवळ कृती केली जाईल असे सांगत, राजकीय पार्श्‍वभूमी नसलेल्या ट्रम्प यांनी पूर्वीच्या नेत्यांना टोमणाही मारला. 

पावसाच्या हलक्‍या सरींमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला माजी अध्यक्ष जिमी कार्टर, बिल क्‍लिंटन पत्नी हिलरीसह आणि जॉर्ज डब्लू बुश पत्नी सारासह उपस्थित होते. ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिया, मुली इव्हांका व टिफनी आणि मुलगे डोनाल्ड ट्रम्प ज्यु., एरिक, बॅरन, जावई जेरेड कुश्‍नर हेही समारंभाला उपस्थित होते. ट्रम्प यांना विरोध असणाऱ्यांनी दिवसभर निदर्शने केली; मात्र शपथविधीच्या कार्यक्रमावर त्याचा परिणाम झाला नाही. 

"बाय अमेरिकन, हायर अमेरिकन' 
नोकऱ्यांमध्ये अमेरिकी नागरिकांना प्राधान्य देण्याची आपली घोषणा डोनाल्ड ट्रम्प अमलात आणणार असल्याचे त्यांच्या आजच्या भाषणावरून स्पष्ट झाले. "अमेरिकी वस्तू खरेदी करा, अमेरिकी नागरिकांनाच काम द्या' (बाय अमेरिकन, हायर अमेरिकन) ही घोषणा त्यांनी या वेळी दिली. आपण नोकऱ्या आणि स्वप्नं परत मिळवू, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. 

ट्रम्प उवाच... 
- जनतेचे यश हेच सरकारचे यश 
- आपला देश अमेरिकी नागरिकांच्या मदतीने उभा करू 
- इस्लामिक दहशतवादाला जगातून समूळ नष्ट करणार 
- आपल्याला देवाचे संरक्षण आहे 

शपथविधी कार्यक्रमाचा इतिहास 
डोनाल्ड ट्रम्प यांचा आज झालेला शपथविधी कार्यक्रम हा 1789 पासूनचा 58 वा अधिकृत शपथविधी कार्यक्रम होता. संयुक्त संसद समिती हा कार्यक्रम आयोजित करते. 1820 पर्यंत अत्यंत साध्या पद्धतीने होणारा हा कार्यक्रम नंतर मात्र मोठ्या आणि दिमाखदार स्वरूपात होऊ लागला. 19 व्या शतकात हा दिवसभराचा कार्यक्रम होऊ लागला. यामध्ये संचलन, आतषबाजी आणि मेजवान्या यांचा समावेश झाला. ट्रम्प यांच्या आजच्या शपथविधीसाठी सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश, नियोजित मंत्रिमंडळ, संसद सदस्य अशा एकूण दोनशे जणांना त्यांच्या कुटुंबीयांसह आमंत्रण होते.


ट्रम्प यांच्यासमोरील आव्हाने
- जागतिक अर्थव्यवस्थेची ढासळती स्थिती
- मध्य पूर्वेतील अशांतता
- इसिसला संपविण्याचे मोठे आव्हान
- रशियासोबतच्या संबंधांमध्ये समतोल साधण्याची कसरत
- अमेरिकी लष्करात मोठे फेरबदल करावे लागणार
- दहशतवादाच्या विरोधातील लढाई
- उत्तर कोरिया आणि चीनकडून असलेला धोका
- अमेरिकेत रोजगारनिर्मितीत वाढ करणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com