ट्रम्प यांनी माजी 'एफबीआय' प्रमुखांना धमकावले

वृत्तसंस्था
रविवार, 14 मे 2017

कथित संभाषणाच्या ध्वनिफितीचा मुद्दा अमेरिकी कॉंग्रेसमध्येही गाजण्याची शक्‍यता आहे. सिनेटच्या इंटेलिजन्स समितीवर असलेल्या डेमोक्रॅट पक्षाच्या सदस्यांनी ती ध्वनिफित अस्तित्वात असेल तर ती प्रसिद्ध केली जावी, असे म्हटले आहे. यामुळे ट्रम्प यांच्यामागे एकाच वेळी 'एफबीआय' आणि अमेरिकी कॉंग्रेसच्या चौकशीचा ससेमिरा लागू शकतो.

न्यूयॉर्क : अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना झालेल्या रशियन सहकार्याची चौकशी करणारे 'एफबीआय'चे संचालक जेम्स कोमी यांची हकालपट्टी करण्यात आल्याने सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का बसला होता. आता ट्रम्प यांनी 'एफबीआय'च्या माजी प्रमुखांना ट्‌विटरवरून थेट लक्ष्य केले आहे.

आपल्या कथित वादग्रस्त ध्वनिफितीबाबत माध्यमांशी बोलू नका, अशी तंबीच ट्रम्प यांनी ट्‌विटरवरून कोमींना दिल्याने खळबळ निर्माण झाली आहे. दरम्यान, या संभाषणाची ध्वनिफित अस्तित्वात आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

अध्यक्षीय निवडणुकीमध्ये ट्रम्प यांना रशियाने मदत केल्याची बाब आता लपून राहिलेली नाही. कोमी नेमकी याचीच चौकशी करू लागल्याने त्यांना पदावरून काढून टाकण्यात आले होते. तत्पूर्वी ट्रम्प यांनी या प्रकरणात कोमींना आपल्याप्रतीची निष्ठा सिद्ध करण्यास सांगितले होते; पण त्यांनी यास नकार दिला होता.

यावर 'फॉक्‍स न्यूज'शी बोलताना ट्रम्प यांनी सांगितले, की आपण येथे निष्ठेचा नाही तर प्रामाणिकपणाचा मुद्दा उपस्थित केला होता. कोमी यांना मात्र कोणत्याही ध्वनिफितीची चिंता नसल्याचे 'सीएनएन'ने म्हटले आहे. 

चौकशीचा ससेमिरा 
कथित संभाषणाच्या ध्वनिफितीचा मुद्दा अमेरिकी कॉंग्रेसमध्येही गाजण्याची शक्‍यता आहे. सिनेटच्या इंटेलिजन्स समितीवर असलेल्या डेमोक्रॅट पक्षाच्या सदस्यांनी ती ध्वनिफित अस्तित्वात असेल तर ती प्रसिद्ध केली जावी, असे म्हटले आहे. यामुळे ट्रम्प यांच्यामागे एकाच वेळी 'एफबीआय' आणि अमेरिकी कॉंग्रेसच्या चौकशीचा ससेमिरा लागू शकतो.

कॉमी यांना लक्ष्य करून ट्रम्प हे चौकशीला दाबू पाहत असल्याचा आरोप डेमोक्रॅट पक्षाच्या सदस्यांनी केला आहे. रशिया प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष प्रतिनिधीस नेमले जावे, असेही त्यांनी म्हटले आहे.