प्रवासी नसल्याने मुंबई-कराची विमानसेवा उद्यापासून बंद

वृत्तसंस्था
रविवार, 7 मे 2017

मुंबई ते कराची ही विमानसेवा रद्द करण्याचे नेमके कारण "पीआयए'ने दिलेले नाही. ही विमानसेवा रद्द होण्यामागे सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्या संबंधांत निर्माण झालेला तणाव कारणीभूत असल्याची माध्यमांमध्ये चर्चा सुरु आहे.

मुंबई : पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सची(पीआयए) मुंबई ते कराची मार्गावरील साप्ताहिक विमानसेवा उद्यापासून(ता. 8) बंद केली जाईल, अशी माहिती कंपनीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. पाकिस्तानची राष्ट्रीय विमान कंपनी असलेल्या 'पीआयए'कडून आठवड्यातून दोन दिवस(सोमवार आणि गुरुवार) विमानसेवा सुरू होती.

मुंबई ते कराची ही विमानसेवा रद्द करण्याचे नेमके कारण 'पीआयए'ने दिलेले नाही. ही विमानसेवा रद्द होण्यामागे सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्या संबंधांत निर्माण झालेला तणाव कारणीभूत असल्याची माध्यमांमध्ये चर्चा सुरु आहे. मात्र, कंपनीने यामागे केवळ व्यावसायिक कारण असल्याचे स्पष्ट करत माध्यमांमधील वृत्त फेटाळून लावले आहे. सध्या या मार्गावर प्रवाशांकडून अत्यंत कमी प्रतिसाद मिळत असल्याने सेवा बंद केली जात असल्याचे कंपनीने सांगितले. पाकिस्तान सरकारकडून यासाठी विशेष अनुदान मिळाले तरच ही सेवा पुन्हा सुरु होईल असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.

परंतु कंपनीची लाहोर-दिल्ली मार्गावरील विमानसेवा सुरुच राहणार आहे. या मार्गावर तुलनेत जास्त रहदारी असल्याने ही सेवा सुरु ठेवणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. त्याचप्रमाणे, मुंबई-कराची सेवा बंद झाल्यास लाहोर-दिल्ली मार्गावरील प्रवाशांच्या संख्येत आणखी भर पडेल असेही कंपनीचे मत आहे.

सुमारे 2004 सालापर्यंत कंपनीचा सुरळित व्यवसाय सुरु होता. परंतु हळुहळु कंपनीवरील आर्थिक भार वाढत गेला.  त्यानंतर 2013 साली नवाज शरीफ यांचे सरकार आल्यानंतर कंपनीला तब्बल 100 अब्ज रुपयांचे नुकसान झाल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.