'आभासी जगा'चा फेसबुकला 3366 कोटींचा फटका!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

'न्यायालयाने दिलेल्या निर्णयाने आम्हाला आनंद झाला आहे. यासाठी झेनिमॅक्सला 50 कोटी रुपये देण्याच्या न्यायालयाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो,' असे झेनिमॅक्सचे कार्यकारी अधिकारी रॉबर्ट म्हणाले.

डल्लास : आभासी जगाची सफर घडविणाऱ्या व्हर्चुअल रिअॅलिटी या तंत्रज्ञानाचा अवैध वापर केल्याबद्दल फेसबुकला तब्बल 50 कोटी डॉलर मोजावे लागणार आहे. फेसबुकच्या संलग्न कंपनी 'ऑक्युलर VR'ने ही नुकसानभरपाई द्यावी असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. 

तंत्रज्ञान चोरीसंदर्भातील हा खटला फेसबुकच्या विरोधात गेला आहे. अमेरिकेतील डल्लास जिल्हा न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली. या निकालानंतर फेसबुकला आता 50 कोटी डॉलरची म्हणजेच सुमारे 3366 कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे. कंपनीच्या कराराचे आणि स्वामीत्व हक्कांचे उल्लंघन करण्याचा आरोप ऑक्युलसचे सहसंस्थापक पाल्मर लकी यांच्यावर होता. 

ऑक्युलस VR ही कंपनी 24 वर्षीय पाल्मर लकी यांनी जून 2012 मध्ये स्थापन केली. त्यानंतर 2014 मध्ये फेसबुकने ही कंपनी 200 कोटी डॉलर एवढी किंमत मोजून खरेदी केली. यासाठी लागणारी कॉम्प्युटर कोडींग झेनिमॅक्स या व्हिडिओ गेम बनवणाऱ्या कंपनीची असल्याचा दावा त्यांनी केल्याने हा वाद न्यायालयात गेला होता. तीन आठवडे चाललेल्या या खटल्यावेळी ऑक्युलस व त्याच्याशी संबंधित अधिकारी उपस्थित होते. कंपनीचे संशोधन बेकायदेशीरपणे वापरून ऑक्युलसने स्वतःचे हेडसेट बनवल्याचा आरोप झेनिमॅक्सने केला होता.

फेसबुकची लोकप्रियता गेल्या काही वर्षांत प्रचंड वाढली आहे. गेल्या वर्षी फेसबुकच्या जाहीरातींरून मिळणाऱ्या महसुलात 53 टक्क्यांनी वाढ झाली आहे. व्हर्चुअल रिअॅलिटी हा फेसबुकच्या व्यवसायाचा अतिशय छोटा भाग आहे. पाल्मर लकी यांच्यामुळे फेसबुक याआधीही वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. अमेरिकेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ प्रचार करण्यासाठी ते उतरल्याचे बोलले जात होते ज्यामुळे फेसबुकने त्यांना प्रसिद्धीपासून दूर राहण्यास सांगितले होते. मागील वर्षी झालेल्या कंपनीच्या विकासकांच्या बैठकीतही त्यांनी सहभाग घेतला नव्हता. आता त्यांच्यावर कंपनीच्या करार उल्लंघनचा आरोप झाल्याने 50 कोटी डॉलरचे नुकसान कंपनीला सहन करावे लागणार आहे. 

'न्यायालयाने दिलेल्या निर्णयाने आम्हाला आनंद झाला आहे. यासाठी झेनिमॅक्सला 50 कोटी रुपये देण्याच्या न्यायालयाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो,' असे झेनिमॅक्सचे कार्यकारी अधिकारी रॉबर्ट म्हणाले.

दरम्यान, 'हा निर्णय धक्कादायक असून या विरोधात आवाज उठवणार असल्याचे' ऑक्युलसतर्फे सांगण्यात आले.
 

Web Title: Facebook loses $500m Oculus virtual reality case