इस्तंबूलमध्ये नाईटक्लबवर हल्ला; 35 ठार

वृत्तसंस्था
रविवार, 1 जानेवारी 2017

इस्तंबूलमधील रईना नाईटक्लबमध्ये शनिवारी मध्यरात्रीनंतर बंदुकधारी व्यक्तीने हल्ला केला. सुरवातीला त्याने नाईटक्लबबाहेरील पोलिसांवर गोळीबार करत त्यांना ठार केले.

इस्तंबूल - तुर्कस्तानमधील इस्तंबूल शहरातील नाईटक्लबवर बंदुकधारी व्यक्तीने केलेल्या हल्ल्यात 35 जण ठार झाले आहेत. नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात आलेल्या नाईटक्लबमधील पार्टीवर हल्ला करण्यात आला असून, अद्याप हल्ल्याची जबाबदारी कोणी स्वीकारलेली नाही.

पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्तंबूलमधील रईना नाईटक्लबमध्ये शनिवारी मध्यरात्रीनंतर बंदुकधारी व्यक्तीने हल्ला केला. सुरवातीला त्याने नाईटक्लबबाहेरील पोलिसांवर गोळीबार करत त्यांना ठार केले. त्यानंतर नाईटक्लबमध्ये घुसून अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात 35 नागरिक ठार झाले असून, 40 हून अधिकजण जखमी झाले आहेत.

नववर्षाच्या स्वागतासाठी नागरिक मोठ्या संख्येने नाईटक्लबमध्ये जमले होते. हल्ला करणारा दहशतवादी हा नाईटक्लबमध्ये सांताक्लॉजचा ड्रेस परिधान करुन आल्याचे सांगण्यात येते आहे. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर तुर्कस्तानमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आले आहे. तुर्कस्तानमध्ये गेल्या 18 महिन्यांमध्ये अनेकवेळा दहशतवादी हल्ले झाले असून, शेकडो नागरिकांना प्राण गमवावे लागले आहे.

Web Title: Gunman Kills at Least 35 People in Istanbul Nightclub Attack