कुलभूषण जाधवप्रकरणी पराभव झालेला नाही : अझीझ 

वृत्तसंस्था
शनिवार, 20 मे 2017

'कुलभूषण जाधवप्रकरणी पाकिस्तानचा पराभव झालेला नाही. न्यायालयाने केवळ फाशीला स्थगिती दिली आहे. तसेच, जाधव यांना वकील देण्याचा आदेशही आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेला नाही,' असा दावा पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे परराष्ट्र धोरणविषयक सल्लागार सरताज अझीझ यांनी केला आहे.

इस्लामाबाद : 'कुलभूषण जाधवप्रकरणी पाकिस्तानचा पराभव झालेला नाही. न्यायालयाने केवळ फाशीला स्थगिती दिली आहे. तसेच, जाधव यांना वकील देण्याचा आदेशही आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेला नाही,' असा दावा पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे परराष्ट्र धोरणविषयक सल्लागार सरताज अझीझ यांनी केला आहे.

जाधव यांना वकील देण्याबाबत निर्णय झाला नसून, याबाबत चर्चा करण्याची तयारी न्यायालयाने दाखविली असल्याचे अझीझ यांनी सांगितले. पाकिस्तानी बाजू मांडण्यासाठी खावर कुरेशी यांच्या निवडीचेही समर्थन त्यांनी केले. तयारी करण्यासाठी केवळ पाच दिवस असल्याने एकमताने त्यांची निवड केल्याचे अझीझ म्हणाले. दरम्यान, कुलभूषण यांना दिलेल्या फाशीच्या शिक्षेविरोधात त्यांच्या आईने केलेली याचिका मिळाली असून त्यावर प्रक्रिया सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.