पाकिस्तानमध्ये पुन्हा राजकीय अस्थिरतेची शक्‍यता

पीटीआय
शुक्रवार, 28 ऑक्टोबर 2016

इस्लामाबाद : पाकिस्तानमधील विरोधी पक्षनेते इम्रान खान यांनी पुन्हा एकदा नवाझ शरीफ यांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. पुढील आठवड्यात पाकिस्तानच्या राजधानीला घेराव घालून ‘बंद‘ पाळण्याचा इशारा देणाऱ्या इम्रान खान यांनी आजपासून (शुक्रवार) राष्ट्रीय पातळीवर निदर्शनेही सुरू करण्याचे आदेश पक्ष कार्यकर्त्यांना दिले आहेत. शरीफ सरकारने इम्रान खान यांच्या पक्षातील काही कार्यकर्त्यांना अटक केल्यानंतर खान यांनी हे पाऊल उचलले आहे. 

पुढील आठवड्यात बुधवारी इस्लामाबादला घेराव घालण्याचा इशारा इम्रान खान यांनी यापूर्वीच दिला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. या आरोपांमुळे शरीफ यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी इम्रान खान यांनी केली आहे. 

या घडामोडींमुळे नवाझ शरीफ आणखी अडचणीत आले आहेत. भारताने केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राईक‘नंतर नवाझ शरीफ आणि पाकिस्तानी लष्करामधील तणाव कमालीचा वाढला आहे. तसेच, या तणावपूर्ण संबंधांविषयीची बातमी पाकिस्तानी प्रसिद्धीमाध्यमांमध्ये फुटल्यामुळेही लष्कर शरीफ यांच्यावर नाराज आहे. या पार्श्‍वभूमीवर इम्रान खान यांनी निदर्शने करण्याचे ठरविले आहे. 

यापूर्वीही 2014 मध्ये इम्रान खान यांनी इस्लामाबादवर प्रचंड मोठा मोर्चा नेला होता. त्यावेळी त्यांनी शरीफ यांच्या निवडणुकीतील विजयाला आक्षेप घेतला होता. 

पोलिसांनी आमच्या पक्षातील महिलांना मारहाण केली. लहान मुलांनाही त्यांनी सोडले नाही. त्यामुळे आम्ही राष्ट्रव्यापी निदर्शने करण्याचे ठरविले आहे. 
- इम्रान खान