कुलभूषण प्रकरणी भारताची पाककडे निकालाच्या प्रतींची मागणी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

कदाचित पोलिसांच्या ताब्यात असताना कुलभूषण जाधव यांचा मृत्यू झाला असावा. मात्र, आपले गैरकृत्य लपवण्यासाठी पाकिस्तानाने त्यांच्या खटल्याचा बनाव रचला असावा. जाधव हे जीवंत आहेत की नाही याची शहानिशा करण्यासाठी सरकारने पाकिस्तानी न्यायालयात हेबियस कॉर्पस (कैद्याला न्यायालयासमोर प्रत्यक्ष हजर करण्याची लेखी आज्ञा) सादर करावे.
- जी. डी. बक्षी, मेजर जनरल (निवृत्त)

इस्लामाबाद: माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्याविरूद्ध दाखल आरोपपत्र आणि फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या निकालाची प्रमाणित प्रत देण्याची मागणी भारताने आज (शुक्रवार) पाकिस्तानकडे केली. तसेच जाधव यांना वकीलाशी संपर्क साधू देण्यासही सांगितले.

इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्त गौतम बंबवाले यांनी आज जाधव प्रकरणात पाकिस्तानी परराष्ट्र सचिव तहमीना जांजुआ यांच्याशी चर्चा केली. पाकिस्तानच्या एका लष्करी न्यायालयाने हेरगिरीचा आरोप ठेवून जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे.

बम्बावाले यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले, की मी आरोपपत्र आणि जाधव यांना सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेच्या निर्णयाची एक प्रमाणित प्रत देण्यास सांगितले आहे. जाधव यांना वकीलाशी संपर्क साधू देण्याची आमची विनंती 13वेळा फेटाळली आहे. मी पाकिस्तानी परराष्ट्र सचिवांना पुन्हा एकदा यासंदर्भात विनंती केली आहे. जेणेकरून आम्ही या निर्णयाला आव्हान देवू शकू. पाकिस्तानच्या वरिष्ठ सैन्य अधिकाऱ्यांनी जाधव यांना सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेप्रकरणी कोणतीही तडजोड न करण्याचा निर्णय काल (गुरूवारी) घेतला. लष्कर प्रमुख जनरल कमर बाज्वा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

लाहोर बार असोसिएशनची धमकी
कुलभूषण जाधव यांचे वकीलपत्र घेतल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी धमकी लाहोर उच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनने दिली आहे. यासंदर्भात पत्रकार परिषदेत माहिती देताना असोसिएशनचे महासचिव आमिद सईद रान म्हणाले, की पाकिस्तान सरकारने परकीय दबावापुढे झुकू नये. भारताने कुलभूषण जाधव यांना देशाचे सुपूत्र घोषित केले असून, त्यांच्या सुटकेसाठी भारत पाकिस्तानवर दबाव आणत आहे. मात्र, पाकिस्तानी नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या भारतीय हेराला कोणत्याही परिस्थितीत सोडता कामा नये आणि त्याला फासावर लटकवलेच पाहिजे.

पुरेशा पुराव्यांनुसारच शिक्षा : पाकचा दावा
विश्‍वासार्ह आणि स्पष्ट पुराव्यांच्या आधारेच कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली असल्याचा दावा पाकिस्तानने आज पुन्हा केला. या पुराव्यांवरून जाधव यांचा हेरगिरी आणि दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याचे सिद्ध होत असल्याचेही पाकिस्तानी पंतप्रधानांचे परराष्ट्रविषयक सल्लागार सरताज अजीज यांनी सांगितले. जाधव यांच्या खटल्यात कायद्याचे पालन करण्यात आले असून, भारत आपल्या प्रतिक्रियेच्या माध्यमातून परिस्थिती बिघडवत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.