कुलभूषण यांच्या सुटकेसाठी प्रयत्नांना वेग; पाककडून विलंब

वृत्तसंस्था
सोमवार, 17 एप्रिल 2017

याप्रकरणी भारताला लवकर कागदपत्रे मिळू नयेत यासाठी पाकिस्तान जाणीवपूर्वक विलंब करत आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्‍ते गोपाळ बागले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

इस्लामाबाद  : भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी भारत सरकारने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले असताना पाकिस्तानने मात्र 'मौनीबाबा'ची भूमिका घेतली आहे.

ज्या लष्करी न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा ठोठावली होती, त्या न्यायालयाचे आदेशपत्र आणि जाधव यांच्याविरोधातील आरोपपत्राची एक प्रत भारत सरकारने मागविली होती; पण पाकिस्तानने ती अद्याप दिलेली नाही. याप्रकरणी भारताला लवकर कागदपत्रे मिळू नयेत यासाठी पाकिस्तान जाणीवपूर्वक विलंब करत आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्‍ते गोपाळ बागले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. जाधव यांना पाकिस्तानी न्यायालयाने ठोठावलेल्या शिक्षेला भारत सरकार आव्हान देणार आहे.

इस्लामाबादेतील भारतीय उच्चायुक्त गौतम बंबावाले यांनी शुक्रवारी याप्रकरणी पाकिस्तानच्या परराष्ट्र सचिव तेहमिना जानुजा यांची भेट घेत आरोपपत्र आणि न्यायालयाच्या आदेशाची प्रत मागितली होती. जाधव यांना आपली बाजू न्यायालयामध्ये मांडता यावी म्हणून भारत सरकार त्यांना कायदेशीर मदतही देणार आहे. पाकमधील लष्करी न्यायालयाने जाधव यांना फाशीची शिक्षा ठोठावल्यानंतर लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाज्वा यांनी त्यावर मान्यतेची मोहोर उमटविली होती.

पाकने तयार केले डोसियर
पाकिस्तानने भारतीय कैद्यांची दहशतवादी कृत्ये आणि कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेवरून निर्माण झालेल्या वादावर पाकिस्तान सरकारने एक डोसियर तयार केले असून, ते संयुक्त राष्ट्रसंघामध्ये सादर केले जाणार आहे. पाकिस्तानातील अन्य देशांच्या प्रतिनिधींनाही हे डोझियर देण्यात येईल. या डोझियरमध्ये जाधव यांनी लष्करी न्यायालयासमोर दिलेल्या कबुलीजबाबाचाही समावेश असेल.