सागरी व्यवहारांवरून विवाद नकोत : भारत 

वृत्तसंस्था
शनिवार, 10 जून 2017

आंतरराष्ट्रीय सागरी हद्दीत मुक्तपणे विहार करण्याचे स्वातंत्र्य प्रत्येक देशाला आहे. त्यामुळे सागरी व्यवहारांवरून वाद निर्माण करणे चुकीचे असल्याचे मत आज भारतातर्फे व्यक्त करण्यात आले. 

वॉशिंग्टन - आंतरराष्ट्रीय सागरी हद्दीत मुक्तपणे विहार करण्याचे स्वातंत्र्य प्रत्येक देशाला आहे. त्यामुळे सागरी व्यवहारांवरून वाद निर्माण करणे चुकीचे असल्याचे मत आज भारतातर्फे व्यक्त करण्यात आले. 

संयुक्त राष्ट्राच्या सागरी परिषदेचा आज येथे समारोप झाला. या परिषदेत भारताचे परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांनी गुरुवारी भाषण केले. अकबर या वेळी म्हणाले, ""21व्या शतकात विकासाची प्रक्रिया वेगवान झाली असून, तिने सागरी हद्दी ओलांडल्या आहेत. त्यामुळे सागरी व्यवहारांवरून विवाद निर्माण व्हायला नकोत. जगातल्या प्रत्येक देशाला आंतरराष्ट्रीय समुद्रात मुक्तपणे विहार करण्याचा हक्क आहे.'' 

चीनच्या भूमिकेमुळे दक्षिण चिनी समुद्रातील सागरी हद्दीवरून मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर अकबर यांनी वरील वक्तव्य केल्याचे मानले जाते. यूएनकडून प्रथमच सागरी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यूएनच्या मुख्यालयात पाच जून ते नऊ जून या काळात ही परिषद पार पडली.