अमेरिकेचे प्यादे बनू नका: चीनचा भारताला इशारा

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 जून 2017

भारत जर स्वत:च्या अलिप्त (नॉन अलाईन्ड) परराष्ट्र धोरणाचा त्याग करुन अमेरिकेचे प्यादे बनला; तर यामुळे दक्षिण आशियातला समतोल बिघडेल

बीजिंग - "चीनचा प्रभाव कमी करण्यासाठी भारताने अमेरिकेशी जवळिक वाढविणे योग्य ठरणार नाही. या धोरणाचे अत्यंत गंभीर परिणाम होतील,' असा इशारा चीनमधील ग्लोबल टाईम्स या सरकारी वृत्तपत्राच्या माध्यमामधून देण्यात आला आहे.

"भारत व अमेरिका चीनच्या उदयामुळे चिंताग्रस्त आहेत. चीनवर दबाव निर्माण करण्यासाठी गेल्या काही वर्षांत अमेरिकेकडून भारताशी जवळिक निर्माण करण्यात आली आहे. भारत हा जपान वा ऑस्ट्रेलियाप्रमाणे अमेरिकेचा साथीदार (अलाय कंट्री) नाही. चीनला रोखण्याकरिता भारताचा वापर अमेरिकेला करु देणे हे भारताच्याही हिताचे नाही. या धोरणाचे गंभीर परिणाम होऊ शकतात. भारत जर स्वत:च्या अलिप्त (नॉन अलाईन्ड) परराष्ट्र धोरणाचा त्याग करुन अमेरिकेचे प्यादे बनला; तर यामुळे दक्षिण आशियातला समतोल बिघडेल,'' अशी टीका ग्लोबल टाईम्समधील या लेखामध्ये करण्यात आली आहे.