भारताच्या प्रक्षोभक विधानांमुळे वातावरण बिघडेल : पाक

वृत्तसंस्था
गुरुवार, 4 मे 2017

भारतात अभ्यास दौऱ्यासाठी गेलेल्या 50 पाकिस्तानी विद्यार्थ्यांना परत पाठविण्याच्या घटनेत कट्टर हिंदू संघटनांचा सहभाग असून, सरकार मूक प्रेक्षकाप्रमाणे हे सर्व पहात आहे. आम्ही हा मुद्दा भारतासमोर उपस्थित करू. 
- नफीस झकेरिया, पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता

इस्लामाबाद - जवानांचे मृतदेह छिन्नविच्छिन्न करण्याच्या घटनेवर भारताने व्यक्त केलेल्या विधानांना पाकिस्तानने आज "प्रक्षोभक' असे संबोधले आहे. यामुळे प्रादेशिक वातावरण बिघडेल, असा सल्ला पाकने दिला आहे.

पाकिस्तानी लष्कराच्या सक्रिय सहभागातूनच जवानांचे मृतदेह छिन्नविच्छिन्न करण्यात आल्याचे भारताने बुधवारी म्हटले होते. पाकच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ता नफीस झकेरिया यांनी संरक्षणमंत्री अरुण जेटली यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना "रेडिओ पाकिस्तान'शी बोलताना सांगितले, की भारतीय जवानांचे मृतदेह कोणत्याही प्रकारे छिन्नविच्छिन्न करण्याची कोणतीही घटना घडली नसल्याचे पाकिस्तानने स्पष्ट केले आहे.

एवढेच नव्हे; तर त्यांनी असाही दावा केला, की भारताने संयुक्त राष्ट्रसंघासमोर कोणताही आरोप करण्याचा अधिकार गमविला आहे. कारण, त्यांनी कधीही जागतिक संघटनेच्या नियमांचे पालन केलेले नाही आणि यासाठी स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त राष्ट्रसंघ सैन्य निरीक्षक गटालाही त्यांनी सहकार्य केलेले नाही. 

ते म्हणाले, की भारताकडून केल्या जाणाऱ्या प्रक्षोभक विधानांमुळे प्रादेशिक वातावरण आणखी बिघडेल. काश्‍मीरमध्ये केल्या जात असलेल्या अत्याचाराच्या घटनांवरून लक्ष हटविण्यासाठी भारत सातत्याने "पाकिस्तान कार्ड' खेळत आहे. 