'ISI'मुळे सिंधची वाटचाल यादवीकडे

पीटीआय
शुक्रवार, 12 मे 2017

'एमक्‍यूएम'चे अध्यक्ष अल्ताफ हुसेन यांचा आरोप; पाक लष्करावरही टीका

लंडन : पाकिस्तानचे लष्कर आणि गुप्तचर संघटना आयएसआय यांच्यामुळे सिंध प्रांताची यादवीकडे वाटचाल सुरू असल्याचा आरोप मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंटचे (एमक्‍यूएम) अध्यक्ष अल्ताफ हुसेन यांनी केला आहे. "एमक्‍यूएम' हा पाकिस्तानमधील चौथ्या क्रमांकावरील मोठा पक्ष असून, सिंध प्रांतातील कराचीमध्ये या पक्षाचा मोठा प्रभाव आहे.

अल्ताफ हुसेन यांनी एक ध्वनिफित प्रसिद्ध करत हे आरोप केले आहेत. पाकिस्तानच्या लष्कराची सूत्रे पंजाब प्रांतातील लष्करी अधिकाऱ्यांकडे एकवटली असून, ते सिंधमध्ये अत्याचार करत असल्याचा आरोप हुसेन यांनी केला आहे. "पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआय यांनी खैबर-पख्तुन्वा, सिंध आणि पूर्ण बलुचिस्तानचा ताबा मिळविला आहे. त्यांनी हजारो निष्पाप मुहाजिर बलुच, पश्‍तून यांची हत्या घडवून आणली आहे. पाकिस्तानी लष्करानेच ओसामा बिन लादेन, मुल्ला ओमर आणि मुल्ला अख्तर मन्सून या कुप्रसिद्ध दहशतवाद्यांना पोसल्याचे जगासमोरही उघड झाले आहे. त्यामुळे या प्रकरणी जागतिक समुदाय आणि संयुक्त राष्ट्र संघाने हस्तक्षेप करावा,' असे हुसेन यांनी म्हटले आहे. कराचीसह संपूर्ण सिंधमध्ये दडपशाही आणि अत्याचाराचे सत्र चालवत पाकिस्तानी लष्कर या प्रांताला अंतर्गत यादवीकडे नेत असल्याची जोरदार टीका हुसेन यांनी केली.

लंडनमध्ये विजनवासात असलेले अल्ताफ हुसेन यांनी गेल्या वर्षी पाकिस्तान सरकारविरोधात चिथावणीखोर भाषण दिल्यानंतर त्यांच्या पक्षनेत्यांविरोधात सरकारने कारवाई सुरू केली आहे. फाळणीनंतर भारतातून पाकिस्तानात स्थलांतरित झालेल्या मुसलमानांची मोठ्या प्रमाणावर संख्या असलेल्या कराची आणि इतर काही भागांमध्ये "एमक्‍यूएम'चा मोठा प्रभाव आहे.