मोदी हे सर्वांत महत्त्वाचे पंतप्रधान

वृत्तसंस्था
बुधवार, 28 जून 2017

इस्राईली माध्यमांकडून आगामी दौऱ्याला महत्त्व; मोदींबाबत उत्सुकता

जेरुसलेम : "सज्ज राहा : जगातील सर्वांत महत्त्वाचे पंतप्रधान येत आहेत', अशा शब्दांत येथील आघाडीच्या वृत्तपत्राने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगामी इस्राईल दौऱ्याचे महत्त्व स्पष्ट केले आहे. पुढील आठवड्यात मोदी इस्राईलला जात असून, या देशाला भेट देणारे भारताचे ते पहिले पंतप्रधान असतील.

इस्राईली माध्यमांकडून आगामी दौऱ्याला महत्त्व; मोदींबाबत उत्सुकता

जेरुसलेम : "सज्ज राहा : जगातील सर्वांत महत्त्वाचे पंतप्रधान येत आहेत', अशा शब्दांत येथील आघाडीच्या वृत्तपत्राने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगामी इस्राईल दौऱ्याचे महत्त्व स्पष्ट केले आहे. पुढील आठवड्यात मोदी इस्राईलला जात असून, या देशाला भेट देणारे भारताचे ते पहिले पंतप्रधान असतील.

यांच्या दौऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर इस्राईलमधील "द मार्कर' या आघाडीच्या वृत्तपत्राने भारत-इस्राईल संबंधांबाबत विस्तृत लेख प्रसिद्ध केला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही नुकताच इस्राईलचा दौरा केला होता. त्यांच्याकडून फार अपेक्षा असताना ते काहीच बोलले नाहीत. त्यामुळेच, प्रचंड लोकप्रियता लाभलेल्या तसेच, सव्वा अब्ज जनतेचे आणि जगातील सर्वाधिक वेगवान अर्थव्यवस्थेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मोदींकडून अपेक्षा असणे साहजिक आहे, असे या लेखात म्हटले आहे. "द मार्कर'व्यतिरिक्त इतर स्थानिक वृत्तपत्रांनीही मोदींच्या या आगामी दौऱ्याला बरीच प्रसिद्धी देण्यास सुरवात केली आहे. पॅलेस्टाइनला न जाता मोदींनी दौऱ्यासाठी केवळ इस्राईलची निवड केल्याचेही अनेक विश्‍लेषकांनी आवर्जून लिहिले आहे.

भारत-इस्राईल यांच्यातील राजनैतिक संबंधांना 25 वर्षे पूर्ण होत असतानाच मोदी चार जुलैला तीन दिवसांसाठी इस्राईलला जात आहेत. मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर भारतासंबंधी घटनांनाही इस्राईलमधील माध्यमांमधून पूर्वीपेक्षा अधिक प्रसिद्धी दिली जात आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाचे वार्तांकनही मोठ्या प्रमाणात करण्यात आले होते. इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनीही गेल्या आठवड्यात मोदींना "मित्र' असे संबोधत त्यांच्या येण्याची उत्सुकतेने वाट पाहत असल्याचे म्हटले होते. मोदींच्या या दौऱ्यात ते इस्राईलच्या प्रमुख नेत्यांबरोबरच येथील भारतीयांशी संवाद साधतील. तसेच, दोन देशांदरम्यान महत्त्वाचे करार होण्याचीही शक्‍यता आहे.

संरक्षण संबंधांवर भर देणार
दोन देशांमधील संबंध दृढ करण्याच्या हेतूने इस्राईलच्या मंत्रिमंडळाने काही निर्णय घेतले आहेत. याशिवाय, दोन्ही देशांमधील उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त निधी उभारणे, भारतीय चित्रपट निर्मात्यांना चित्रीकरणासाठी सवलत देणे, पर्यटनवृद्धी, कृषी प्रकल्प याबाबतही सहकार्य करण्याचा प्रस्ताव आहे. भारत-इस्राईल संरक्षण संबंध वेगाने वाढले आहेत. हे संबंध आणखी दृढ करण्याचा मोदी प्रयत्न करतील. मोदींच्या या दौऱ्यापूर्वीच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांच्यासह विविध खात्यांच्या वरिष्ठ सचिवांनी, मंत्र्यांनी आणि नौदलप्रमुखांनी इस्राईलचा दौरा करत विविध संभाव्य करारांसाठी पाया तयार केला आहे.