लास व्हेगास येथील हल्ला आम्हीच घडविला: इसिसचा दावा

वृत्तसंस्था
मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017

पॅडॉक हा "इसिसचा सैनिक' असल्याचे सांगत त्याने काही महिन्यांपूर्वीच इस्लाम धर्म स्वीकारला होता, असा दावा इसिसकडून करण्यात आला आहे. पॅडॉकचा धर्म वा त्याच्या जीवनशैलीबद्दल अद्यापी निश्‍चित माहिती मिळू शकलेली नाही

वॉशिंग्टन - अमेरिकेतील लास व्हेगास येथे आयोजित करण्यात आलेल्या एका संगीत कार्यक्रमादरम्यान करण्यात आलेल्या बेछूट गोळीबाराची जबाबदारी इस्लामिक स्टेट (इसिस) या जागतिक दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. मात्र इसिसच्या या दाव्यास अद्यापी सुरक्षा दलांकडून मान्यता मिळालेली नाही. या गोळीबारामध्ये किमान 59 नागरिक मृत्युमुखी पडले; तर तब्बल 500 हून अधिक जण जखमी झाले.

स्टीफन पॅडॉक या 64 वर्षीय श्‍वेतवंशीय अमेरिकन नागरिकाने हा हल्ला घडविला. पॅडॉक याने अप्रतिहत गोळीबारानंतर स्वत:वरही गोळी झाडून आत्महत्या केल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. पॅडॉक हा "इसिसचा सैनिक' असल्याचे सांगत त्याने काही महिन्यांपूर्वीच इस्लाम धर्म स्वीकारला होता, असा दावा इसिसकडून करण्यात आला आहे. पॅडॉकचा धर्म वा त्याच्या जीवनशैलीबद्दल अद्यापी निश्‍चित माहिती मिळू शकलेली नाही.

मात्र पॅडॉक हा इसिसशी संबंधित असल्याचा कोणताही पुरावा आत्तापर्यंत आढळला नसल्याची माहिती अमेरिकेतील प्रमुख तपास संस्था असलेल्या एफबीआयच्या प्रवक्‍त्याने दिली आहे.

अमेरिकेच्या इतिहासातील ही अलीकडच्या काळातील गोळीबाराची सर्वांत मोठी घटना मानली जाते. संगीताचा कार्यक्रम (म्युझिक कॉन्सर्ट) सुरू असलेल्या ठिकाणाच्या शेजारी मांडाले बे कॅसिनो असून, या हॉटेलच्या 32व्या मजल्यावरून पॅडॉक याने अत्याधुनिक शस्त्रातून गोळीबार केला