एकमेकांचा आदर करु: मोदींचा चीनला संदेश

वृत्तसंस्था
शुक्रवार, 9 जून 2017

चीनकडून घोषित करण्यात आलेल्या वन बेल्ट वन रोड (ओबीओआर) परिषदेवर भारताकडून बहिष्कार टाकण्यात आल्यानंतर पहिल्यांदाच दोन देशांच्या प्रमुखांची भेट झाली आहे. सीपेक वा ओबीओआर पाकव्याप्त काश्‍मीरमधील गिलगिट बाल्टिस्तान भागामधून जात असल्याने भारताकडून या परिषदेवर बहिष्कार घालण्यात आला होता

अस्ताना - चीन-पाकिस्तान आर्थिक क्षेत्र (सीपेक) व आण्विक पुरवठादार गटामध्ये (एनएसजी) भारताच्या प्रवेशास चीनचा असलेला विरोध; या दोन मुख्य घटकांमुळे निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणाच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी व चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या झालेल्या भेटीमध्ये "दोन्ही देशांच्या मुख्य भूमिकांचा आदर ठेवावयास हवा,'' अशी आग्रही भूमिका मोदी यांच्याकडून मांडण्यात आली.

कझाकस्तानची राजधानी अस्ताना येथे होत असलेल्या "शांघाय कोऑपरेशन असोसिएशन (एससीओ)' या संघटनेच्या बैठकीनिमित्त मोदी व जिनपिंग यांची भेट झाली. चीनकडून घोषित करण्यात आलेल्या वन बेल्ट वन रोड (ओबीओआर) परिषदेवर भारताकडून बहिष्कार टाकण्यात आल्यानंतर पहिल्यांदाच दोन देशांच्या प्रमुखांची भेट झाली आहे. सीपेक वा ओबीओआर पाकव्याप्त काश्‍मीरमधील गिलगिट बाल्टिस्तान भागामधून जात असल्याने भारताकडून या परिषदेवर बहिष्कार घालण्यात आला होता. या बैठकीदरम्यान मोदी व जिनपिंग यांनी जागतिक पातळीवर सहकार्याची भूमिका घेण्याबरोबरच एकमेकांच्या मुख्य भूमिकांचा आदर व मतभेद सामोपचाराने सोडविण्यावर भर दिला.

"भारत व चीनमधील मतभेदांचा या चर्चेत उल्लेख करण्यात आला. मात्र या मतभेदांचे रुपांतर वादामध्ये होऊ न देणे महत्त्वाचे आहे,'' अशी प्रतिक्रिया भारताचे परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांनी यासंदर्भात बोलताना व्यक्‍त केली.