दहशतवादी बटला बनायचे होते सुरक्षारक्षक

वृत्तसंस्था
सोमवार, 12 जून 2017

लंडन - लंडन ब्रिज हल्ला प्रकरणातील मूळ पाकिस्तानी दहशतवादी खुर्रम बट हा क्रीडा स्पर्धांवेळी सुरक्षा पुरविणाऱ्या संस्थेमध्ये नोकरी मिळविण्यासाठी प्रयत्नशील होता, अशी माहिती उघड झाली आहे. अशा ठिकाणी नोकरी करून विंबल्डनसारख्या प्रसिद्ध स्पर्धांवेळी घातपात घडवून आणण्याचा त्याचा इरादा असण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

येथील माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, खुर्रम बट हा सुरक्षा पुरविणाऱ्या कंपनीमध्ये नोकरी मिळविण्यासाठी प्रयत्न करत होता. विंबल्डन आणि लीग फुटबॉल स्पर्धांना सुरक्षा पुरविणाऱ्या कंपनीमध्ये त्याने अर्जही केला होता. ही मुलाखत या महिन्याच्या अखेरीस होणार होती. मात्र, त्यापूर्वीच त्याने लंडन ब्रिजवर हल्ला केला आणि पोलिसांच्या गोळीबारात ठार झाला. बट याने क्रीडा स्पर्धांना लक्ष्य करण्याचे ठरवले असेल; मात्र, मॅंचेस्टर स्फोटानंतर आपली योजना बदलत त्याने लंडन ब्रिजवर हल्ला केला असण्याची शक्‍यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. बट याने पूर्वी लंडन अंडरग्राउंड या वाहतूक सेवेत सहा महिने काम केले होते. बट याच्यावर पूर्वीपासूनच तपास यंत्रणांचे लक्ष असले तरीही त्याला वेस्टमिंस्टर स्थानकात नोकरी मिळाली होती. तो पोलिसांच्या नजरेत असल्याचे संबंधित सुरक्षा कंपनीला माहीत नव्हते. त्यामुळे त्याला नोकरी मिळाली असती तर त्याने दहशतवाद्यांना क्रीडा स्पर्धांवेळी स्टेडियममध्ये प्रवेश दिला असता, असे सूत्रांचे म्हणणे आहे.