संपूर्ण अमेरिका हल्ल्याच्या टप्प्यात : उत्तर कोरिया 

वृत्तसंस्था
शनिवार, 29 जुलै 2017

उत्तर कोरियाने महिनाभरात दुसऱ्यांदा आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली आहे. हा जागतिक शांततेला मोठा धोका आहे. त्याचे गंभीर परिणाम होणार आहेत. 
- डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकेचे अध्यक्ष

सोल : ताज्या आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र (आयसीबीएम) चाचणीमुळे न्यूयॉर्कसह संपूर्ण अमेरिकेवर हल्ला करण्याची क्षमता प्राप्त करण्यात उत्तर कोरियाला यश आले असल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे. तर, संपूर्ण अमेरिकेवर हल्ला करण्याची क्षमता आम्ही प्राप्त केली असल्याचे उत्तर कोरियाने म्हटले आहे. 

उत्तर कोरियाने शुक्रवारी दुसऱ्यांदा आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली होती. या माध्यमातून उत्तर कोरियाने पुन्हा एकदा अमेरिकेला थेट आव्हान देण्याचा प्रयत्न केला असल्याचे मानले जाते. ""दुसऱ्या "आयसीबीएम' चाचणीमुळे आम्ही अमेरिकेत कुठेही हल्ला करू शकतो. हा अमेरिकेसाठी धोक्‍याचा इशारा आहे,'' असे वक्तव्य उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जॉंग उन यांनी केले असल्याचे सरकारी वृत्तसंस्थेने म्हटले आहे. 

उत्तर कोरियाने चार जुलै पहिली "आयसीबीएम' चाचणी घेतली होती. शुक्रवारी घेण्यात आलेल्या क्षेपणास्त्र चाचणीद्वारे उत्तर कोरिया दहा हजार किलोमीटरच्या टप्प्यात हल्ला करू शकते. म्हणजेच अमेरिकेत कुठेही हल्ला करण्याची ताकद उत्तर कोरियाने संपादन केली असल्याचे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले. 

संयम बाळगण्याचा चीनचा सल्ला 
दरम्यान, उत्तर कोरियाने दुसऱ्यांदा आयसीबीएम चाचणी घेतल्याबद्दल चीनने खडे बोल सुनावले आहे. या चाचणीमुळे तणावात भर पडणार असून, त्या पार्श्‍वभूमीवर सर्व बाजूंनी शांतता आणि स्थैर्य कायम ठेवण्याची खबरदारी घेत संयम बाळगावा, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्‍त्याने म्हटले आहे. उत्तर कोरिया संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या ठरावाचा भंग करत असल्याचा आरोपही चीनने केला आहे. 
रशिया, इराण आणि उत्तर कोरियाच्या विरोधात अधिक कडक निर्बंध लादण्याच्या ठरावाला अमेरिकी संसदेने मंजुरी दिल्यानंतर त्याच्या दुसऱ्याच दिवशी उत्तर कोरियाकडून क्षेपणास्त्र चाचणी घेण्यात आली.