कुलभूषण जाधवप्रकरणी पाककडून याचिकेची तयारी 

पीटीआय
रविवार, 8 ऑक्टोबर 2017

इस्लामाबाद : पाकिस्तानात बंदिस्त असलेले कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेविरोधात भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात केलेल्या युक्तिवादाला उत्तर देण्यासाठी पाकिस्तानने याचिका दाखल करण्याची तयारी केली आहे. 

इस्लामाबाद : पाकिस्तानात बंदिस्त असलेले कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेविरोधात भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात केलेल्या युक्तिवादाला उत्तर देण्यासाठी पाकिस्तानने याचिका दाखल करण्याची तयारी केली आहे. 

भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी जाधव यांना पाकिस्तानच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी मार्च 2016 मध्ये बलुचिस्तानमध्ये नजरचुकीने ताब्यात घेतले होते. त्यानंतर पाकिस्तानच्या सैनिक न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध खटला भरला. त्यानंतर जाधव यांना हेरगिरी आणि चिथावणीखोर कारवायाच्या आरोपावरून मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. यासंदर्भात भारताने आंतराष्ट्रीय न्यायालयात जाधव यांच्या शिक्षेला आव्हान दिले.

पाकिस्तानला 13 डिसेंबरपूर्वी लिखित उत्तर देण्याचे आंतरराष्ट्रीय न्यायालयाने सांगितले होते, जेणेकरून पुढील कार्यवाही सुरू करता येईल. परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रानुसार ऍटर्नी जनरल अश्‍तर आसफ अली यांनी काल मंत्रालयाच्या कायदेतज्ञांशी आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केली व त्यात आंतरराष्ट्रीय न्यायालयातील युक्तिवादाबाबत विचार करण्यात आला.

सूत्रानुसार, पाकिस्तान सर्वशक्तीनिशी आंतरराष्ट्रीय न्यायालयात आपले म्हणणे मांडणार आहे. यादरम्यान, आसफ यांनी पाकिस्तानच्या वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय न्यायालयीन प्रक्रियेच्या स्थितीचे अवलोकन करण्यासाठी प्रत्येक आठवड्यात बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. जेणेकरून इस्लामाबादच्या दृष्टिकोनातून मूर्त रूप देता येईल.