#MeToo मोहिमेला थेट संयुक्त राष्ट्रसंघाचा पाठिंबा

गुरुवार, 23 नोव्हेंबर 2017

संयुक्त राष्ट्रसंघ : संयुक्त राष्ट्रसंघाने महिलांवरील अत्याचाराच्याविरोधात मोहिम सुरू करून दशके लोटली; मात्र त्या मोहिमेतून फारसे काही हाती लागले नाही. मात्र, हॉलीवूडमधील आणि अमेरिकी काँग्रेसमधील प्रसिद्ध व्यक्तींच्या लैंगिक शोषणाची प्रकरणे बाहेर पडताच महिलांवरील अत्याचाराचा मुद्दा वर्तमानपत्रावरील पहिल्या पानावरच्या बातम्या बनल्या. टीव्हीवरच्या प्राईम टाईमचा वेळ या विषयाला मिळाला. कित्येक वर्षांच्या मोहिमेने जे साध्य केले नाही, ते काही आठवड्यांच्या बातम्यांनी आणि सोशल मीडियावरील कॅम्पेन्सनी केले.

संयुक्त राष्ट्रसंघ : संयुक्त राष्ट्रसंघाने महिलांवरील अत्याचाराच्याविरोधात मोहिम सुरू करून दशके लोटली; मात्र त्या मोहिमेतून फारसे काही हाती लागले नाही. मात्र, हॉलीवूडमधील आणि अमेरिकी काँग्रेसमधील प्रसिद्ध व्यक्तींच्या लैंगिक शोषणाची प्रकरणे बाहेर पडताच महिलांवरील अत्याचाराचा मुद्दा वर्तमानपत्रावरील पहिल्या पानावरच्या बातम्या बनल्या. टीव्हीवरच्या प्राईम टाईमचा वेळ या विषयाला मिळाला. कित्येक वर्षांच्या मोहिमेने जे साध्य केले नाही, ते काही आठवड्यांच्या बातम्यांनी आणि सोशल मीडियावरील कॅम्पेन्सनी केले. आता संयुक्त राष्ट्रसंघाच्या महिला संस्थेनेही या वातावरणाचा फायदा जनजागृतीसाठी घ्यायचे ठरवले आहे.

हाच तो क्षण आहे... चौकटीबाहेर पडण्याचा...

'हाच तो क्षण आहे. चौकटीतून बाहेर पडण्याची हीच वेळ आहे,' या शब्दात संयुक्त राष्ट्रसंघाच्या महिला विभागाच्या संचालक फुमझिले मलांबो गुका सध्याच्या वातावरणाचे वर्णन केले आहे. 25 नोव्हेंबर हा दिवस महिलांवर होणाऱया हिंसाचाराचे निर्मुलन करण्याचा दिवस म्हणून राष्ट्रसंघ पाळतो. प्रसिद्ध व्यक्तींनी केलेल्या लैंगिक शोषणाविरुद्ध सोशल मीडियावर उठलेला दणकट आवाज गुका यांना भावला आहे. 'आताच्या महिला अधिकाराच्या पदावरही आहेत आणि त्यांना इतर महिलांवर होणाऱया अत्याचाराचा निषेधही करावासा वाटतो आहे,' असे निरीक्षण 25 नोव्हेंबरच्या पार्श्वभूमीवर गुका यांनी दिलेल्या मुलाखतीत नोंदविले आहे. 

#MeToo हॅशटॅगमधून आला मोकळेपणा...

गेल्या दोन महिन्यांत ट्विटर, फेसबुकसह अन्य सोशल माध्यमांमध्ये '#MeToo' या हॅशटॅगने धुमाकूळ घातला. जगभरातील लाखो महिलांनी आपल्यावर झालेल्या अन्याय, अत्याचाराला या हॅशटॅगद्वारे वाचा फोडली. अनेकांनी कित्येक वर्षांपूर्वीचा आपल्यावरील अत्याचार 2017 मध्ये जगासमोर मोकळेपणाने मांडला. 

काळ बदलला...आता महिला बोलणार...

'पूर्वी अशा प्रकारचे शोषण घडले असते, तर ते प्रकरण लगेच झाकून टाकण्याचा प्रयत्न झाला असता. आज तसे घडत नाही. महिला अधिकाधिक जागृत होत आहेत. महिला जेव्हापासून कामावर जायला लागल्या आहेत, तेव्हापासून लैंगिक छळ, छेडछाड आणि बलात्काराच्या घटना घडतच आहेत. आज हजारो महिला याविरुद्ध बोलत आहेत. आवाज उठवत आहेत. सगळ्यांना बोलायला इतका का वेळ लागला, इतकीच खंत मला वाटते आहे,' असे गुका यांनी मुलाखतीत सांगितले. 

'आज जशा महिला अधिकारपदावर आहेत, तसेच कायदेही अधिक सक्षम आहेत. त्यामुळेच, आपल्यापेक्षा बलवान अशा शत्रूंविरोधात त्या आवाज उठवू शकत आहेत. अत्याचार करणाऱयाला त्याची शिक्षाही मिळताना दिसते आहे. त्यांच्या नोकऱया गेल्या आहेत. त्यांना खटल्यांना तोंड द्यावे लागले आहे. हाय-प्रोफाईल व्यक्ती असूनही त्यांची सुटका झालेली नाही,' असे निरीक्षणही गुका यांनी मांडले. 

प्रसिद्ध व्यक्तींची अप्रसिद्ध काळी बाजू...

ब्रिटीश मनोरंजन क्षेत्रातील बडे प्रस्थ असलेल्या जीमी सॅव्हिल याचा 2011 मध्ये मृत्यू झाला. त्यानंतर 2013 मध्ये पोलिसांनी जीमीने तब्बल पन्नास वर्षांच्या प्रदीर्घ काळात 214 वेळा महिलांवर अत्याचार केल्याचे उघडकीस आणले. यापैकी 34 प्रकरणे बलात्काराची होती आणि त्यातही बहुतांश स्त्रिया त्यावेळी 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या होत्या. या घटनेने अवघा युरोप हादरला होता. जीमी सॅव्हिल प्रकरणाचा विशेष उल्लेख गुका यांनी केला. 'अमेरिकाज् डॅड' म्हणून ओळख असलेला बिल कॉस्बी याने पन्नासहून अधिक स्त्रियांवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याचे नुकतेच उघड झाले. हार्वे विन्स्टिन या हॉलीवूडमधील प्रसिद्ध आसामीने तब्बल शंभरहून अधिक महिलांवर अत्याचार केले. रिपब्लिकन सिनेटर रॉय मूर याच्यावरही महिलांवर अत्याचाराचे गुन्हे दाखल झाले आहेत. या सर्व प्रकरणांचा उल्लेख गुका यांनी केला. 

पीडितेवर आता अधिक विश्वास...

'आधी पीडित महिलेच्या तक्रारीकडे संशयाने पाहिला जायचे. विशेषतः ती तक्रार प्रसिद्ध पुरूषांविरुद्ध असेल, तर सर्वसामान्य लोक पीडितेच्या तक्रारीवर विश्वास ठेवत नसत. गेल्या दोन महिन्यांमध्ये अशा प्रकरणांना जगभर मिळालेली प्रसिद्धी आणि त्याचे परिणाम पाहता आता परिस्थिती बदलत आहे. लोक पीडितेवर अधिक विश्वास ठेवू लागले आहेत. उलट, पीडितेवर अविश्वास दाखविणारे संशयाच्या पिंजऱयात आहेत,' अशी बदलती परिस्थिती गुका यांनी निदर्शनास आणून दिली. 

राष्ट्रसंघाच्या अंदाजानुसार जगभरातील 35 टक्के महिलांना आयुष्यात कधी ना कधी लैंगिक हिंसाचाराला अथवा अत्याचाराला सामोरे जावे लागले आहे. अनेकदा हे अत्याचार जवळच्या व्यक्तींकडून झालेले आहेत. काही अभ्यासानुसार अत्याचाराच्या तब्बल सत्तर टक्के प्रकरणांमध्ये संबंधित महिलेच्या अथवा मुलीच्या जवळची व्यक्ती सामील असते.

गुका दक्षिण आफ्रिकेच्या आहेत. नेल्सन मंडेला यांचे 'महिलांवर अत्याचार होत असताना चांगली माणसे काही करत नसतील, तर तो महिलांविरुद्धचा कटच असतो,' हे विधान प्रसिद्ध आहे. गुका यांनी मुलाखतीत या विधानाचा आधार घेतला. 

Web Title: Marathi news MeToo hashtag campaign women atrocities