मसूद अजहर हा दहशतवादीच: परवेझ मुशर्रफ

वृत्तसंस्था
शुक्रवार, 28 ऑक्टोबर 2016

पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये दहशतवाद्यांच्या छावण्या असल्याची माहिती नाही. या छावण्यांची नेमकी संख्या जर मला कळली; तर मी तुम्हाला नक्कीच सांगेन! 

नवी दिल्ली - जैश-इ-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्‍या मसूद अजहर हा "दहशतवादी‘ असल्याचे मत व्यक्त करत पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांनी मसूद याचा पाकिस्तानमधील बॉंबस्फोटांमध्येही सहभाग असल्याचे म्हटले आहे. 

यावर संयुक्त राष्ट्रसंघाकडून मसूद याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्यासंदर्भात आडकाठी आणू नये, असे आवाहन पाकिस्तान चीनला का करत नाही, अशी विचारणा मुशर्रफ यांना करण्यात आली. या प्रश्‍नाचे थेट उत्तर टाळत मुशर्रफ यांनी अजहर याचा चीनशी संबंध नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्‍त केली. 

पाकिस्तानमधील सध्याचे नवाझ शरीफ यांचे सरकार आक्रमक नसल्याची टीका त्यांनी यावेळी केली. याचबरोबर, दिल्लीमधून पाकिस्तानला माहिती पुरविणाऱ्या हेरास अटक करण्यात आल्यासंदर्भात काहीही माहिती नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याखेरीज पाकिस्तान व आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टिकोनामधून अत्यंत संवेदनशील असलेल्या अन्य मुद्यांसंदर्भातही मुशर्रफ यांनी भूमिका स्पष्ट केली. 

ते म्हणाले - 
* पाकिस्तानमध्ये लष्कराकडे सत्ता असताना देशाचा विकास झाल्याचे दिसून आले 

* पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये दहशतवाद्यांच्या छावण्या असल्याची माहिती नाही. या छावण्यांची नेमकी संख्या जर मला कळली; तर मी तुम्हाला नक्कीच सांगेन! 

* पाकिस्तान हा सामर्थ्यशाली लष्कर असलेला अण्वस्त्रसज्ज देश आहे. पाकिस्तानवर वर्चस्व गाजविता येणार नाही. 
* भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व शरीफ यांच्यामधील हस्तांदोलन हे निव्वळ एक कृत्रिम पाऊल आहे. सर्वमान्य तोडग्यासाठी भरीव प्रयत्न करणे आवश्‍यक आहे 

पाकिस्तानचे सध्याचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना मुशर्रफ यांच्याकडून सातत्याने लक्ष्य करण्यात येत आहे. पाकमधील सध्याच्या संवेदनशील राजकीय परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर मुशर्रफ यांचा हा नवा हल्ला अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे.  

Web Title: Masood Azhar is a Terrorist, says Musharraf