नेपाळ: धोकादायक हिमतलावाची पातळी झाली कमी

वृत्तसंस्था
सोमवार, 31 ऑक्टोबर 2016

"पुराची शक्‍यता लक्षात घेता या तलावामधील जलसाठा कमी करण्यास सरकारचे प्राधान्य होते. तेव्हा सध्यापुरता हा धोका टाळण्यात यश मिळाले आहे,'' असे या प्रकल्पाशी संबंधित उच्चस्तरीय अधिकारी तोप बहादुर खत्री यांनी सांगितले

काठमांडू - माऊंट एव्हरेस्टच्या अगदी नजीक असलेल्या व प्रचंड क्षेत्रफळ असलेल्या हिमतलावामधील (ग्लेशिअल लेक) जलसाठा कमी करण्यात नेपाळला यश आले आहे. इमजा त्शो असे या तलावाचे नाव असून तो माऊंट एव्हरेस्टच्या दक्षिणेस अवघ्या 10 किमी अंतरावर आहे. समुद्रसपाटीपासून हे ठिकाण 16,437 फूट उंचीवर आहे.

इमजा त्शो हा नेपाळमधील सर्वांत वेगाने प्रसरण पावणारा हिमतलाव आहे. मात्र हवामान बदलाच्या संकटामुळे अशा स्वरुपाच्या हिमतलावांमधील बर्फ अत्यंत वेगाने वितळण्याची भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. या तलावामधील बर्फही वितळून पूर आल्यास त्यामुळे हजारो नागरिकांना फटका बसून मोठी जीवितहानी होण्याचीही शक्‍यता होती. या पार्श्‍वभूमीवर, नेपाळने या हिमतलावामधील जलसाठी कमी केला आहे.

सुमारे दीडशे फुट खोल असलेल्या या तलावाची पातळी सहा महिन्यांच्या कष्टप्रद मोहिमेनंतर साडेतीन मीटरने खाली आली आहे. या प्रयत्नांत तलावामधील पन्नास लाख क्‍युबिक मीटरपेक्षाही जास्त पाणी तलावाबाहेर काढण्यात आले आहे. नेपाळ व संयुक्त राष्ट्रसंघांच्या एकत्रित प्रयत्नांमधून हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला. यासाठी येथील स्थानिक 100 नागरिकांसह नेपाळी सैन्यामधील 40 सैनिकांची तुकडी गेल्या एप्रिल महिन्यापासून कार्यरत होती. साहित्याच्या दळणवळणासाठी याक वा हवाई मार्गाचा वापर करण्यात आला. तलावामधील पाणी बाहेर सोडण्यासंदर्भात नियंत्रण मिळविण्यासाठी येथे यांत्रिक दरवाजाही बसविण्यात आल्याची माहिती सैन्याच्या तुकडीचे नेतृत्व करणाऱ्या लेफ्टनंट कर्नल भारत लाल श्रेष्ठ यांनी दिली. या भागामधील वारे, बर्फ आणि विरळ हवेमुळे दिवसामध्ये केवळ दोन तीन तास काम करणेच शक्‍य असल्याचे सूत्रांनी सांगितले.

1984 ते 2009 या काळामध्ये या तलावाचे क्षेत्रफळ 0.4 किमीवरुन 1.1 चौरस किमी इतके वाढले होते. यामुळे या तलावामधील पाणी बाहेर पडून 50 हजारपेक्षाही जास्त नागरिकांना फटका बसण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. आता हाच प्रकल्प इतर धोकादायक हिमतलावांसाठीही अंमलात आणला जाणार आहे.

नेपाळमध्ये सुमारे तीन हजार हिमतलाव आहेत.
 

ग्लोबल

टोकियो - डोकलाम येथील भारत-भूतान-चीन या ट्रायजंक्‍शनजवळ भारतीय लष्कर व चिनी सैन्य...

10.57 AM

बार्सिलोना - स्पेनमधील दुसरे सर्वांत मोठे शहर असलेल्या बार्सिलोना येथे गर्दीमध्ये...

10.33 AM

सोल : कोरिया द्विपकल्पात कोणत्याही प्रकारचे युद्ध होणार नाही, असे दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जी इन यांनी म्हटले आहे. उत्तर...

गुरुवार, 17 ऑगस्ट 2017