'वन चायना'च्या बदल्यात ट्रम्प यांनी "काहीतरी' मिळविले

वृत्तसंस्था
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

वॉशिंग्टन: चीनच्या "वन चायना' धोरणाला मान्यता देण्याच्या बदल्यात अमेरिकचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना "काहीतरी' मिळाले असल्याचे व्हाइट हाउसने आज सूचित केले.

वॉशिंग्टन: चीनच्या "वन चायना' धोरणाला मान्यता देण्याच्या बदल्यात अमेरिकचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना "काहीतरी' मिळाले असल्याचे व्हाइट हाउसने आज सूचित केले.

अध्यक्ष म्हणून निवडून आल्यावर ट्रम्प यांनी "वन चायना' धोरणाला फाटा देत तैवानशी संपर्क साधला होता. यावरून चीनने बराच आकांडतांडव केला होता. आज पत्रकारांशी दैनंदिन वार्तालापावेळी व्हाइट हाउसचे सचिव सीन स्पायसर यांनी याबाबत माहिती दिली. "जिनपिंग यांची विनंती ट्रम्प यांनी मान्य केली असून, त्याबदल्यात अमेरिकी लोकांना चीनकडून काही तरी मिळण्याचे ठरविण्यात आले आहे,' असे स्पायसर म्हणाले. तैवानला आपलाच भाग समजणाऱ्या चीनने अमेरिका आणि तैवानमधील चर्चेनंतर अमेरिकेला कडक इशारा दिला होता. त्यानंतर ट्रम्प यांनी नरमाईचे धोरण स्वीकारत आपण "वन चायना' धोरण मान्य करत असल्याचे चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना सांगितले होते.
दरम्यान, "व्हाइट हाऊस'मधील गोपनीय माहिती फुटण्यामागे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांचा हात होता, असा आरोप ट्रम्प यांनी केल्याचे सांगितले जाते. "व्हाइट हाऊस'ने मात्र याबाबत माहिती देण्यास नकार दिला आहे.