ट्रम्प यांना ठार मारण्याचा प्रयत्न: तरुण अटकेत

वृत्तसंस्था
मंगळवार, 21 जून 2016

लास वेगास - अमेरिकेमधील रिपब्लिकन पक्षाचे इच्छुक उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या लास वेगासमधील एका सभेदरम्यान एका 19 वर्षीय ब्रिटीश तरुणाने येथील एका पोलिस अधिकाऱ्याची बंदूक हिसकावत त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला.

नेवाडा येथे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार या तरुणाचे नाव मायकेल सॅंडफोर्ड असे आहे. अटक करण्यात आल्यानंतर सॅंडफोर्ड याने आपण ट्रम्प यांना ठार करण्यासाठी कॅलिफोर्निया येथून आलो असल्याचे सांगितले. याआधी कधीही बंदुक न चालविलेल्या सॅंडफोर्ड याने एक दिवस आधी येथील "फायरिंग रेंज‘वर जाऊन सराव केल्याचे निष्पन्न झाले. याचबरोबर, लास वेगास येथील योजना फसल्यास ट्रम्प यांना त्यांच्या नंतर होणाऱ्या सभेमध्ये ठार मारण्याचा निर्धारही त्याने व्यक्त केला. 

पोलिसांच्या चौकशीमध्ये तो ट्रम्प यांना ठार मारण्याचा प्रयत्न गेल्या सुमारे दीड वर्षापासून करत असल्याचेही आढळून आले. या प्रकरणी ब्रिटीश परराष्ट्र मंत्रालयाकडून "मदत‘ केली जात असल्याची प्रतिक्रिया येथील प्रवक्‍त्याने व्यक्‍त केली. या प्रकरणी दोषी आढळल्यास सॅंडफोर्ड याला 10 वर्षांपेक्षा जास्त कारावासाची शिक्षा आणि अडीच लाख डॉलर्सचा दंड ठोठावला जाऊ शकतो.