तमीळ, गुजरातीसाठीही ऑक्‍सफोर्डचा शब्दकोश

वृत्तसंस्था
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

जगभरात डिजिटल दळणवळण वाढत असताना त्यात प्रामुख्याने इंग्रजी आणि चिनी व स्पॅनिश यासारख्या प्रमुख भाषांचे वर्चस्व आहे. इंटरनेट आणि भाषिक वैविध्ये व लवचिकता यांच्या स्थित्यंतराच्या काळात आपण आहोत. यानुसार पुढील पावले आपण उचलायला हवीत

नवी दिल्ली - ऑक्‍सफोर्ड युनिव्हर्सिटी प्रेस हिंदी भाषेनंतर आता तमीळ आणि गुजराती भाषांसाठी ऑनलाइन शब्दकोश ऑनलाइन उपलब्ध करून दिले आहेत. जगभरातील भाषांचे शब्दकोश ऑनलाइन पातळीवर उपलब्ध व्हावेत यासाठी ऑक्‍सफोर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने सप्टेंबर 2015 पासून प्रकल्प सुरू केला आहे.

"ऑक्‍सफोर्ड ग्लोबल लॅंग्वेजेस' या प्रकल्पांतर्गत जगभरातील शंभर भाषांचे शब्दकोश तयार करून ते ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. जगभरातील भाषांमधील भाषिक स्रोत ऑनलाइन उपलब्ध व्हावेत, हा यामागे उद्देश आहे. डिजिटल माध्यमातून स्वत:च्या भाषेत मजकूर निर्मिती करणाऱ्यांना यामुळे मोठी मदत होणार आहे. संकेतस्थळे, ऍप्लिकेशन आणि अन्य डिजिटल माध्यमांमध्ये काम करणाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. गेल्या वर्षी ऑक्‍सफोर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने हिंदी ऑनलाइन शब्दकोश सुरू केला होता. आता तमीळ आणि गुजराती भाषांचे ऑनलाइन शब्दकोश उपलब्ध करून दिले आहेत.

या विषयी बोलताना ऑक्‍सफोर्ड डिक्‍शनरीजचे संचालिका ज्युडी पिअरसॉल म्हणाल्या, ""ऑक्‍सफोर्ड युनिव्हर्सिटी प्रेससाठी हे आधुनिक आव्हान आणि मोठी संधी आहे. जगभरात डिजिटल दळणवळण वाढत असताना त्यात प्रामुख्याने इंग्रजी आणि चिनी व स्पॅनिश यासारख्या प्रमुख भाषांचे वर्चस्व आहे. इंटरनेट आणि भाषिक वैविध्ये व लवचिकता यांच्या स्थित्यंतराच्या काळात आपण आहोत. यानुसार पुढील पावले आपण उचलायला हवीत.''

Web Title: oxford tamil dictionary