पाकिस्तानचा भारताविरोधात कांगावा

पीटीआय
शनिवार, 20 मे 2017

भारताचा अणुकार्यक्रम अत्यंत वेगाने वाढत असल्याबाबत अनेक अहवाल प्रसिद्ध झाले असून आपले म्हणणे सिद्ध करण्यास ते पुरेसे आहेत, असा दावाही झकेरिया यांनी केला. झकेरिया यांनी यासाठी हार्वर्ड केनेडी स्कूलने प्रसिद्ध केलेल्या अहवालाचा दाखला दिला

इस्लामाबाद - नागरी वापरासाठी म्हणून भारताने मिळविलेल्या आण्विक साहित्याचा वापर आवस्त्रे तयार करण्यासाठी केला जात असल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे. कुलभूषण जाधवप्रकरणी नाचक्की झाल्यामुळे जगाचे आणि आपल्या नागरिकांचेही लक्ष भरकटविण्याचा पाकिस्तान सरकारचा हा प्रयत्न असल्याचे मानले जाते.

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नफीस झकेरिया यांनी आज पत्रकार परिषद घेत भारतावर आरोप केले. ते म्हणाले, ""अणुसुरक्षा गटाच्या माध्यमातून नागरी वापरासाठी भारताला मिळालेल्या आण्विक साहित्याचा वापर त्यांनी आण्वस्त्रे तयार करण्यासाठी केला आहे. आयात केलेल्या अणुइंधनाचा, तंत्रज्ञानाचा आणि इतर साहित्याचा असा वापर भारताकडून होण्याची शक्‍यता असल्याचे भारताने वारंवार आंतरराष्ट्रीय समुदायाला सांगितले आहे. भारताकडून सातत्याने असा गैरप्रकार होत असून, आशियातील शांततेला हा फार मोठा धोका आहे.''

भारताचा अणुकार्यक्रम अत्यंत वेगाने वाढत असल्याबाबत अनेक अहवाल प्रसिद्ध झाले असून आपले म्हणणे सिद्ध करण्यास ते पुरेसे आहेत, असा दावाही झकेरिया यांनी केला. झकेरिया यांनी यासाठी हार्वर्ड केनेडी स्कूलने प्रसिद्ध केलेल्या अहवालाचा दाखला दिला.

पाकिस्तानातून भारतात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना मूलभूत सुविधाही नाकारल्या जात असल्याचा आरोप करतानाच झकेरिया यांनी भारत प्रत्येक बाबीमध्ये राजकारण करत असल्याचा कांगावा केला.

रा. स्व. संघावरही टीका
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जम्मू-काश्‍मीरमधील अस्तित्व वाढले असून मूळ काश्‍मीरमधील नसलेले अनेक लोक येथे संघाच्या शाखा सुरू करत आहेत, अशी टीकाही नफीस झकेरिया यांनी केली. काश्‍मिरी नागरिकांवर दबाव निर्माण करून स्वयंनिर्णयाच्या त्यांच्या चळवळीपासून त्यांना दूर करण्यासाठी संघाच्या कार्यकर्त्यांची संख्या येथे जाणीवपूर्वक वाढविली जात असल्याचा दावा त्यांनी केला.