भारताची भाषा बोलणारी अमेरिका दुटप्पी': पाककडून अमेरिकेला शिव्याशाप!

वृत्तसंस्था
बुधवार, 28 जून 2017

या निवेदनामध्ये पाकिस्तानचा थेट उल्लेख करण्यात आल्याबरोबरच सलाहुद्दीन याला जागतिक दहशतवादी घोषित करण्यासंदर्भातील निर्णय हादेखील भारताचा मोठा राजनैतिक विजय मानला जात आहे. यामुळे पाकिस्तानी नेतृत्वाचा अक्षरश: जळफळाट झाला आहे

नवी दिल्ली - भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व मोदी यांच्यामध्ये आश्‍वासक चर्चा झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर असुरक्षित झालेल्या पाकिस्तानकडून अत्यंत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे. "काश्‍मीरप्रश्‍नी दुटप्पी भूमिका' घेणारी अमेरिका "भारताच्या भाषेत' बोलत असल्याची टीका पाकिस्तानकडून करण्यात आली आहे.

मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेकडून काश्‍मीरमधील हिझबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा फुटीरतावादी म्होरक्‍या सईद सलाहुद्दीन याला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आले होते. याचबरोबर, मोदी व ट्रम्प यांच्यामधील चर्चेनंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनामध्ये "पाकिस्तानने इतर देशांवर दहशतवादी हल्ला करण्यासाठी पाक भूमीचा वापर करु देऊ नये,' असे थेट आवाहन करण्यात आले होते. यामुळे पाककडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे.

"पाकिस्तानने दहशतवादाच्या सर्व प्रकारांविरोधात लढण्यासंदर्भात कायमच कटिबद्धता दर्शविली आहे. या संकटाचा सामना करताना पाकिस्तानने मनुष्यबळ व आर्थिक संपत्ती अशा दोन्ही प्रकारे मोठे बलिदानही दिले आहे. आंतरराष्ट्रीय समुदायानेही पाकिस्तानच्या या प्रयत्नांची दखल घेतली आहे,'' असे निवेदन पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाकडून यानंतर प्रसिद्ध करण्यात आले होते.
या निवेदनामध्ये पाकिस्तानचा थेट उल्लेख करण्यात आल्याबरोबरच सलाहुद्दीन याला जागतिक दहशतवादी घोषित करण्यासंदर्भातील निर्णय हादेखील भारताचा मोठा राजनैतिक विजय मानला जात आहे. यामुळे पाकिस्तानी नेतृत्वाचा अक्षरश: जळफळाट झाला आहे.

""काश्‍मिरी नागरिकांच्या रक्ताचे अमेरिकेला महत्त्व वाटत नाही, असे दिसते. याचबरोबर, मानवाधिकारांसंदर्भातील आंतरराष्ट्रीय कायदेही काश्‍मीरला लागू होत नाहीत, अशी अमेरिकेची धारणा झालेली दिसते. राज्यपुरस्कृत दहशतवादाकडे अशा पद्धतीने डोळेझाक करण्यामुळे केवळ आंतरराष्ट्रीय संकेत व न्यायाची कुचेष्टा होते असे नाही; तर मानवाधिकार व लोकशाही अधिकारांच्या संरक्षणाचा दावा करणाऱ्यांचा दुटप्पीपणाही उघड होतो,'' अशी कठोर टीका पाकिस्तानचे अंतर्गत सुरक्षा मंत्री चौधरी निसार यांनी केली आहे.

पाकिस्तानवर विविध मार्गांनी दबाव आणून जागतिक दहशतवादाविरोधात आंतरराष्ट्रीय पातळीवर पाठिंबा मिळविण्याचे आक्रमक धोरण भारताकडून गेल्या दोन-तीन वर्षांत राबविण्यात आले आहे. या पार्श्‍वभूमीवर, पाकिस्तानची ही प्रतिक्रिया अत्यंत संवेदनशील मानली जात आहे!