पाकच्या अटकेतील कुलभूषण जाधव यांना फाशी

वृत्तसंस्था
सोमवार, 10 एप्रिल 2017

पाकिस्तानी सैन्य कायद्यांतर्गत जाधव यांच्याविरोधात खटला चालविण्यात आला. जाधव यांना फाशीची शिक्षा सुनाविण्यात आली  आहे. जाधव यांनी पाकिस्तानमध्ये अस्थिरता निर्माण करण्यासह देशाविरुद्ध युद्ध पुकारण्याचा प्रयत्न केल्याची कबुलीही दिली आहे...

नवी दिल्ली - हेरगिरीच्या आरोपांतर्गत पाकिस्तानमध्ये अटक करण्यात आलेल्या कुलभूषण जाधव या भारतीय नागरिकास आज (सोमवार) फाशी सुनाविण्यात आल्याची घोषणा पाक सैन्यातर्फे करण्यात आली आहे.

जाधव यांना गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यात (2016) हेरगिरीच्या आरोपांतर्गत अटक करण्यात आली होती. जाधव हे भारतीय गुप्तचर संस्था असलेल्या रॉचे एजंट असल्याचा पाकचा आरोप आहे. पाकिस्तानमध्ये हिंसक कृत्ये करुन अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न जाधव यांनी केल्याचा दावाही पाकिस्तानकडून करण्यात आला होता. मात्र जाधव हे भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी असून आता त्यांचा भारतीय लष्कराशी काहीही संबंध नसल्याची भूमिका भारताकडून घेण्यात आली आहे.

काही महिन्यांपूर्वी, जाधव भारतीय नौदलाचे अधिकारी असल्याची "कबुली' देणारे चित्रीकरणही पाककडून प्रसिद्ध करण्यात आले होते.

"भारतीय रॉ एजंट कुलभूषण जाधव उर्फ हुसेन मुबारक पटेल यांना पाकिस्तानी सैन्यातर्फे राबविण्यात आलेल्या मोहिमेंतर्गत बलुचिस्तानमधून अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानी सैन्य कायद्यांतर्गत जाधव यांच्याविरोधात खटला चालविण्यात आला. जाधव यांना फाशीची शिक्षा सुनाविण्यात आली असून सैन्यप्रमुख जनरल कमर जावेद बाज्वा यांनी या शिक्षेस मान्यता दर्शविली आहे. जाधव यांनी पाकिस्तानमध्ये अस्थिरता निर्माण करण्यासह देशाविरुद्ध युद्ध पुकारण्याचा प्रयत्न केल्याची कबुलीही दिली आहे,'' असे पाकिस्तानी सैन्यातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.

जाधव यांना इराणमधून अटक करण्यात आल्याची भारतीय सरकारची धारणा आहे. पाकिस्तानने भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांस जाधव यांची भेट घेऊ दिली नव्हती.

"जाधव यांच्यावर ग्वदार बंदरासह एकंदर चीन-पाकिस्तान आर्थिक क्षेत्राचे सध्या चाललेले काम उध्वस्त करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यांना झालेली अटक हा भारताच्या पाकिस्तानमधील हस्तक्षेपाचा थेट पुरावा आहे. पाकिस्तानच्या दृष्टिकोनामधून जाधव यांना झालेली अटक हे मोठे यश आहे,'' असे बाज्वा यांनी या पार्श्‍वभूमीवर म्हटले होते.