काश्‍मीरमधील असंतोषाला दहशतवाद कारणीभूत नाही - अझीझ

वृत्तसंस्था
मंगळवार, 2 मे 2017

काश्‍मीरमधील संघर्ष हा दहशतवादाचाच परिणाम असल्याचे जगासमोर मांडणे हा भारताचा इरादा आहे. मात्र, कोणत्याही देशाला हे मान्य नाही. त्यामुळे याप्रकरणी बहुपक्षीय चर्चा करण्याचे तुर्कस्तानच्या अध्यक्षांनी दिलेला सल्ला योग्य आहे.

इस्लामाबाद - जम्मू आणि काश्‍मीरमधील असंतोष हा सीमेपलीकडून होणाऱ्या घुसखोरीचाच परिणाम असल्याचा भारताचा आरोप आंतरराष्ट्रीय समुदायाने नाकारला असल्याचा दावा पाकिस्तानने आज केला. तसेच, काश्‍मीरची समस्या चर्चेद्वारे सोडविण्याच्या सर्व संधी भारताने हातच्या घालविल्याचा कांगावाही पाकिस्तानने केला. 

काश्‍मीर मुद्दा आणि काश्‍मीर खोऱ्यातील मानवाधिकारांच्या होणाऱ्या उल्लंघनाबद्दल पाकिस्तानने नेहमीच आवाज उठविला असल्याचे पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे सल्लागार सरताज अझीझ यांनी आज निवेदनाद्वारे सांगितले.

"काश्‍मीरमधील संघर्ष हा दहशतवादाचाच परिणाम असल्याचे जगासमोर मांडणे हा भारताचा इरादा आहे. मात्र, कोणत्याही देशाला हे मान्य नाही. त्यामुळे याप्रकरणी बहुपक्षीय चर्चा करण्याचे तुर्कस्तानच्या अध्यक्षांनी दिलेला सल्ला योग्य आहे. द्विपक्षीय चर्चेबाबत भारताने अनेक संधी गमावल्याने त्यांच्यावर आमचा विश्‍वास नाही,' असे अझीझ यांनी निवेदनामध्ये म्हटले आहे. काश्‍मिरी जनतेवर अत्याचार करून भारत सरकारने क्रूरतेचे आपलेच विक्रम मोडल्याची गरळही त्यांनी ओकली आहे.