कंदिल बलोचला हवे होते भारतीय नागरिकत्व

वृत्तसंस्था
शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2016

पाकिस्तानमध्ये निराश झाल्याने मी भारतीय नागरिकत्व स्वीकारण्याचा विचार करत आहे.

नवी दिल्ली - प्रसिद्ध पाकिस्तानी मॉडेल कंदिल बलोच हिला भारतीय नागरिकत्व हवे असल्याचे तिने केलेल्या ट्विटमधून समोर आले आहे. 

कंदिल बलोचची शनिवारी तिचा भाऊ महंमद वासिम यानेच गोळ्या झाडून हत्या केली होती. फेसबुकवर अश्‍लील व्हिडिओ आणि प्रतिक्रिया देण्यासाठी कंदिल प्रसिद्ध होती. यावरूनच तिचा भावाबरोबर वाद होत असे आणि त्यातूनच भावाने गोळ्या झाडून तिची हत्या केली. पोलिसांनी तिच्या भावाला अटक केली आहे. कंदिलने मॉडेलिंग व अभिनय सोडावा, असा तगादा तिच्या भावाने लावला होता. एका मुस्लिम धर्मगुरूसोबत सेल्फी काढल्याने कंदिल प्रसिद्धीच्या झोतात आली होती. कंदिलने सोशल मीडियावर पाकिस्तानी क्रिकेटपटू इम्रान खान आणि भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली यांच्यावर प्रेम असल्याचे जाहीर केले होते. याबरोबरच तिने मार्चमध्ये झालेल्या ट्‌वेंटी-20 विश्वकरंडकात पाकिस्तानने भारताचा पराभव केला, तर स्ट्रीप डान्स करण्याचे जाहीर केले होते.

ईदपूर्वी कंदिलने सोशल मीडियावरील एका संदेशात तिला स्वत:च्या सुरक्षेची काळजी वाटत असल्याचे म्हटले होते. कंदिलने मार्चमध्ये केलेल्या ट्विटमध्ये म्हटले होते, की पाकिस्तानमध्ये निराश झाल्याने मी भारतीय नागरिकत्व स्वीकारण्याचा विचार करत आहे. तिने हे ट्विट करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही टॅग केले होते. पाकिस्तानचे नागरिक मला स्वीकारायला तयार नाहीत, त्यामुळे मला भारतात कामाला सुरवात करण्याचे सोपे वाटत आहे. कंदिल बिग बॉसमध्येही सहभागी होण्याची चर्चा होती.