सोल : देशातील राजकीय गैरव्यवहार प्रकरणी सॅमसंग कंपनीचे उपाध्यक्ष ली जे-योंग यांचे नाव पुढे आले असून, त्यांची या प्रकरणी चौकशी होणार आहे.
दक्षिण कोरियाच्या पदच्युत अध्यक्षा पार्क ग्वेन-हे यांचा समावेश असलेल्या राजकीय गैरव्यवहारात सॅमसंग कंपनीचे नाव घेतले जात आहे. ली जे-योंग हे सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचे उपाध्यक्ष असून, सॅमसंग समूहाचे अध्यक्ष ली कून-ही यांचे ते पुत्र आहेत. या राजकीय गैरव्यवहारात संशयित म्हणून ली यांची चौकशी होणार आहे.
पार्क ग्वेन-हे यांच्या निकटवर्ती चोई सून-सील यांनी त्यांच्या ताब्यातील दोन स्वयंसेवी संस्थांना कोट्यवधी डॉलर कंपन्याकडून मिळविल्याचा आरोप आहे. या निधीचा उपयोग त्यांनी व्यक्तिगत बाबींसाठी केल्याचा आरोप आहे. या स्वयंसेवी संस्थांना पैसे देणाऱ्या कंपन्यांमध्ये सॅमसंगचे नाव आघाडीवर आहे. या प्रकरणाची चौकशी तपास यंत्रणांकडून सुरू आहे.
|