सौदीसह चार देशांनी तोडले कतारसोबतचे संबंध

पीटीआय
सोमवार, 5 जून 2017

या घटनेचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारातही दिसून आला. कच्चे तेल व नैसर्गिक वायूचे दर अनुक्रमे 1.42 व 1.37 टक्‍क्‍यांनी वाढल्याचे दिसून आले. या घडामोडींवर कतारने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. कतारमध्ये 2022 साली फुटबॉल विश्‍वकरंडक स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.

दुबई : कतार आपल्या देशांतर्गत कारभारात हस्तक्षेप करत आहे, तसेच दहशतवादाला पाठिंबा देत आहे असा आरोप करीत सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, बहारीन आणि इजिप्त यांनी आज (सोमवार) कतारसोबतचे सर्व राजनैतिक संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे.

सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि बहारीन यांच्या या निर्णयामुळे मागील महिन्यापासून पर्शियन आखाती देशात निर्माण झालेली दरी अजूनच वाढली आहे. अशातच इजिप्तने देखील कतारसोबतचे सर्व राजनैतिक संबंध तोडले.

सौदी अरेबियाची राजधानी असलेल्या रियाधच्या सर्व सीमा बंद केल्या असून कतारला जोडणारे सर्व रस्ते, जलमार्ग व हवाई मार्ग बंद करण्यात आले आहेत, असे सौदी अरेबियाच्या "एसपीए' या सरकारी वृत्तवाहिनीने म्हटले आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने दहशतवाद व जहालमतवाद यांना आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले. या अभूतपूर्व निर्णयामुळे अमेरिकेशी निकटचे संबंध असलेल्या आखाती देशांमध्ये गंभीर विभाजन झाले आहे.

या चार देशांनी कतारच्या संकेतस्थळांवर बंदी घातल्यानंतर दोन आठवड्यींनी कतारचा स्वतंत्र मुस्लिम राज्यकर्ता शेख तमीम बीन हमद अल थानी याने आरडाओडरडा करण्यास सुरवात केली. मात्र दोहा सरकारने शेख तमीम बीन हमद अल थानी यांच्या वक्तव्यात काही तथ्य नसल्याचा दावा करत त्यांच्या या कृतीला "लाजीरवाणा सायबर गुन्हा' असे संबोधले आहे.

संयुक्त अरब अमिरातीने कतारच्या मुत्सद्देगिरांना 48 तासांत देश सोडून जाण्यास सांगितले आहे. अबू धाबीने दोहावर दहशतवादाला पाठिंबा व अर्थसाह्य करत असल्याचा आरोप केला. इतिहाद एअरवेज या संयुक्त अरब अमिरातीच्या कंपनीने दोहाकडे जाणाऱ्या आणि दोहाकडून येणाऱ्या सर्व हवाई सेवा मंगळवारपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. दोहा देशाच्या सुरक्षेला आणि स्थिरतेला धक्का लावत असून देशाच्या अंर्तगत कारभारात हस्तक्षेप करत आहे, असे बहारिनमधील एका वृत्तवाहिनीने सांगितले.

येमेनमधील हौती बंडखोरांविरुद्धच्या सौदी अरेबियाप्रणित अरब राष्ट्रांच्या आघाडीनेही कतारला बाजूला सारले आहे. दहशतवाद पसरवणाऱ्या कारवाया करणे तसेच अल्‌ कायदा व दाईश अशा संघटनांना पाठिंबा देण्याच्या आरोपाखाली कतारला या आघाडीतून बाहेर काढण्यात आले आहे.