भारतीय महिलेचा सौदीत असह्य छळ; कुटूंबीयांची परराष्ट्र मंत्र्यांकडे धाव

वृत्तसंस्था
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

त्यांनी हुमेरास चार-पाच दिवस खोलीत डांबून ठेवले. तिने पलायन केल्यास गंभीर परिणाम होतील, अशी धमकीही तिला देण्यात आली

हैदराबाद - हैदराबाद येथील एका महिलेचा सौदी अरेबियामध्ये मानसिक व लैंगिक छळ केला जात असल्याचे सांगत या पीडितेच्या कुटूंबीयांनी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना या प्रकरणी मदतीची विनंती केली आहे. सौदी अरेबियात छळ होत असलेल्या या महिलेचे नाव हुमेरा असे असून तिची मोठी बहिण असलेल्या रेष्मा यांनी स्वराज यांनी या प्रकरणी हस्तक्षेप करावा, अशी विनंती केली आहे.

"माझ्या बहिणीला सतत मारहाण केली जाते; तसेच तिला पुरेसे अन्नही दिले जात नाही. तिला नोकरीवर ठेवणाऱ्या कुटूंबातील एकाने वाईट हेतुने तिला ओढण्याचा प्रयत्नही केला. मात्र तिने किंकाळी फोडून त्याच्या खोलीमधून पळ काढला. यानंतर त्यांनी हुमेरास चार-पाच दिवस खोलीत डांबून ठेवले. तिने पलायन केल्यास गंभीर परिणाम होतील, अशी धमकीही तिला देण्यात आली,'' असे रेष्मा यांनी म्हटले आहे.

हुमेरा यांना एका एजंटने 25 हजार रुपये पगाराची नोकरी देण्याचे आश्‍वासन देऊन सौदी अरेबियामध्ये पाठविले होते. सतत छळ होत असल्याने हुमेरा यांनी तेथील पोलिस स्थानकामध्ये एजंटविरोधात तक्रार नोंदविण्याचा प्रयत्नही केला. मात्र पोलिसांनी यावर काहीच कारवाई केली नाही. या पार्श्‍वभूमीवर, हुमेराची सुटका करण्यात यावी, अन्यथा असह्य छळामुळे ती आत्महत्या करेल, अशी आर्त विनवणी रेष्मा यांनी परराष्ट्र मंत्र्यांस केली आहे.