सीरियात गॅस हल्ल्यात शेकडो मृत्युमुखी

वृत्तसंस्था
बुधवार, 5 एप्रिल 2017

या हल्ल्यादरम्यान स्फोटांचे मोठे आवाज झाले. यानंतर अनेकजण जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत पडल्याचे निदर्शनास आले.

दमास्कस : सीरियाच्या वायव्य भागातील इदलिब प्रांतात मंगळवारी रासायनिक हल्ला करण्यात आल्याचा संशय आहे. या हल्ल्यात शंभरहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्याचा परिणाम शेकडो लोकांच्या आरोग्यावर झाला असून, चारशेहून अधिक लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या हल्ल्याबद्दल आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक नेत्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. हा युद्ध लादण्याचा गुन्हा आहे असे एका ब्रिटिश अधिकाऱ्याने सांगितले. 
या हल्ल्यात लहान मुलांचे सर्वाधिक बळी गेले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

इदलिब प्रांतातातील खान शयखून भागात ही घटना घडल्याचे सीरियातील SOHR या मानवाधिकार संस्थेने म्हटले आहे. 'सीरियातील स्थानिक वेळेनुसार सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाला. या हल्ल्यादरम्यान स्फोटांचे मोठे आवाज झाले. यानंतर अनेकजण जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत पडल्याचे निदर्शनास आले. या हल्ल्यातील पीडित लोकांना चालताही येत नव्हते, असे इदलिब मीडिया सेंटरच्या वृत्तछायाचित्रकाराने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. 

घटनास्थळीच अनेकजणांना प्राण सोडताना येथील डॉक्टरांनी पाहिले, असे इदलिबमधील एका स्वयंसेवी संस्थेच्या रुग्णवाहिका सेवेचे प्रमुख मोहंमद रसुल यांनी बीबीसीला सांगितले.

या हल्ल्याबद्दल अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्स या देशांनी सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बसर-अल-असद यांना जबाबदार धरले आहे. तर दुसरीकडे सीरियाच्या लष्कराने बंडखोरांनी हा हल्ला घडवून आणल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, क्लोरिन गॅसचे चार थर्मोबेरिक बॉम्बचा सीरियावर हल्ला करण्यात आला असल्याचे एका फेसबुक पोस्टमध्ये जाहीर करण्यात आले होते. 

सीरियाच्या पुढील वाटचालीबाबत चर्चा करण्यासाठी ब्रसेल्समध्ये दोनदिवसीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. युरोपीय संघ, संयुक्त राष्ट्रसंघ हे या संमेलनात सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर हा हल्ला कोणी व का घडवून आणला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच, या हल्ल्यात वापरण्यात आलेले विमान कोणते होते हेही अद्याप समजू शकलेले नाही.