ब्रिटनच्या मतदारांचा थेरेसांना धोबीपछाड 

पीटीआय
शनिवार, 10 जून 2017

मित्र पक्षाला सोबत घेऊन आपण कठीण काळात ब्रिटनचे नेतृत्व करू, अशी प्रतिक्रिया मे यांनी निकालानंतर बोलताना दिली. निवडणूक निकालांत कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाची पीछेहाट झाल्याचे चित्र समोर आल्यानंतर विरोधी पक्षाचे नेते जेरेमी कॉर्बीन यांनी मे यांच्या राजिनाम्याची मागणी केली आहे.

लंडन - ब्रिटनच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी जवळजवळ पूर्ण झाली असून, मध्यावधी निवडणुका घेण्याचा डाव ब्रिटिश मतदारांनी पंतप्रधान थेरेसा मे यांच्यावरच आज उलटवला असल्याचे स्पष्ट झाले. एकूण 650 पैकी 649 जागांचे निकाल जाहीर झाले असून, मे यांच्या कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाला 318 जागांवर समाधान मानावे लागले आहे, तर विरोधी लेबर पक्षाला 261 जागा मिळाल्या आहे. बहुमतासाठी 326 जागांची आवश्‍यकता असते. त्यामुळे मतदारांनी दिलेला कौल पाहता ब्रिटनच्या संसदेत त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. 

मित्र पक्षाला सोबत घेऊन आपण कठीण काळात ब्रिटनचे नेतृत्व करू, अशी प्रतिक्रिया मे यांनी निकालानंतर बोलताना दिली. निवडणूक निकालांत कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाची पीछेहाट झाल्याचे चित्र समोर आल्यानंतर विरोधी पक्षाचे नेते जेरेमी कॉर्बीन यांनी मे यांच्या राजिनाम्याची मागणी केली आहे. मात्र, मे यांनी राजिनामा देण्याची शक्‍यता फेटाळून लावली आहे. "डाउनिंग स्ट्रीट'कडून जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार राणी एलिझाबेथ द्वितीय यांची भेट घेऊन मे आजच सरकार स्थापनेचा दावा करतील. "हाऊस ऑफ कॉमन्स'मधील डेमोक्रॅटिक युनिओनिस्ट पार्टीच्या (डीयूपी) दहा खासदारांचा पाठिंबा घेण्यात येणार असल्याचे समजते. 

"ब्रेक्‍झिट'च्या निर्णयावेळी मे यांच्या सोबत असलेला मतदार सार्वत्रिक निवडणुकीतही आपल्यालाच प्राधान्य देईल, या आशेने पंतप्रधान मे यांनी मध्यावधी निवडणुकीची घोषणा केली होती. मात्र, मध्यावधी निवडणुकीला सामोरे जाण्याचा मे यांचा डाव त्यांच्यावरच उलटला आहे. मावळत्या सभागृहात मे यांच्या कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाकडे स्पष्ट बहुमत होते. मात्र, ताज्या निवडणूक निकालात मे यांच्या पक्षाला बहुमताचा आकडाही पार करता आलेला नाही. त्यामुळे ब्रिटिश संसदेत त्रिशंकू परिस्थिती तयार झाली असून, मे यांना आता मित्र पक्षाची मदत घेण्याशिवाय गत्यंतर उरले नाही. युरोपीयन युनियनमधून (ईयू) ब्रिटन बाहेर पडण्याची प्रक्रिया आता अधिक गुंतागुंतीही होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. ब्रेक्‍झिटची प्रक्रिया सुरू करण्याबाबतच्या चर्चेला काही दिवसांतच सुरवात होणार होती. मात्र, ही चर्चा आता लांबणीवर टाकण्यात आल्याची माहिती "ईयू'कडून देण्यात आली.