बेपत्ता विमानाचा शोध तीन वर्षांनी थांबविला

वृत्तसंस्था
बुधवार, 18 जानेवारी 2017

मलेशिया, ऑस्ट्रेलिया, चीनकडून निर्णय जाहीर

सिडनी- मलेशियन एअरलाइन्सचे "एमएच 370' हे विमान तीन वर्षंपूर्वी उड्डाणानंतर अचानक बेपत्ता झाले होते. तेव्हापासून सुरू असलेला विमानाचा शोध थांबविल्याचे ऑस्ट्रेलिया, मलेशिया व चीनच्या सरकारने मंगळवारी जाहीर केले.

मलेशिया, ऑस्ट्रेलिया, चीनकडून निर्णय जाहीर

सिडनी- मलेशियन एअरलाइन्सचे "एमएच 370' हे विमान तीन वर्षंपूर्वी उड्डाणानंतर अचानक बेपत्ता झाले होते. तेव्हापासून सुरू असलेला विमानाचा शोध थांबविल्याचे ऑस्ट्रेलिया, मलेशिया व चीनच्या सरकारने मंगळवारी जाहीर केले.

हे विमान 8 मार्च 2014 रोजी क्वालालंपूरहून बीजिंगला जात होते. विमानात प्रवासी व कर्मचारी मिळून 239 जण होते. दक्षिण हिंद महासागरावरून जात असताना विमानाचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. तेव्हापासून त्याचा शोध घेण्यात येत होता. हिंद महासागराच्या एक लाख 20 हजार चौरस कि.मी. परिसरात गेले तीन वर्षे सातत्याने शोध घेऊनही हाती काही लागले नाही, असे ऑस्ट्रेलिया, मलेशिया व चीनतर्फे प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. "सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञान, विज्ञानाचा वापर, नामांकित तज्ज्ञांचा सल्ला व अनेक प्रात्यक्षिकांचा वापर या शोधमोहिमेत करण्यात आला. तरीही विमानाचा शोध घेण्यास अपयश आले,' असे या राष्ट्रांनी नमूद केले आहे. यामुळेच "एमएच 370'चा सागरी तळात सुरू असलेला शोध अखेर थांबविण्यात आला असल्याचे त्यांनी जाहीर केले.

या महिन्याच्या सुरवातीस ही शोधमोहीम थांबविण्याची तयारी मलेशियाने केली होती. मात्र अजूनही नवी माहिती समजेल व भविष्यात विमानाचा शोध लागेल, अशी आशा आम्हाला होती, असेही या देशांच्या सरकारने म्हटले आहे. विमानाचे वाहून गेलेले तीन अवशेष हिंद महासागराच्या पश्‍चिम भागात सापडले असल्याचा वृत्तास तपास पथकाने दुजोरा दिला. अजून काही अवशेष मिळाले असले, तरी ते याच विमानाचे आहेत का, याबद्दल शंका असल्याचे ते म्हणाले.

"एमएच 370' संघटनेची नाराजी
मलेशियाच्या "एमएच 370' या विमानातील प्रवासी व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी स्थापन केलेल्या "व्हॉइस 370' या संघटनेने म्हटले आहे, की विमानाचा शोध थांबविण्याचा निर्णयाने मनात भीती दाटून आली आहे. प्रवाशांमध्ये विमान वाहतूक सुरक्षेबद्दल विश्‍वासाची भावना निर्माण होण्यासाठी तज्ज्ञांनी निश्‍चित केलेल्या नवीन भागात या विमानाचा शोध घेणे आवश्‍यक आहे. त्यानुसार शोधमोहीम पुढे सुरू ठेवावी, अशी मागणी संघटनेने संबंधित अधिकाऱ्यांकडे केली आहे. व्यावसायिक तत्त्वावरील विमानांचा शोध थांबविला जाऊ नये, असेही मत व्यक्त करण्यात आले आहे.