अणुचाचणीनंतर उत्तर कोरियात 200 मृत्युमुखी

वृत्तसंस्था
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

बोगदा कोसळून घडली दुर्घटना; जपानी माध्यमांचा दावा

टोकियो: उत्तर कोरियाने अलीकडे घेतलेल्या एका भूमिगत अणुचाचणीमुळे घडलेल्या दुर्घटनेत 200 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचा दावा जपानच्या माध्यमांनी आज केला. अणू परीक्षणाच्या ठिकाणी घेतलेल्या या चाचणीनंतर तेथील बोगदा कोसळून ही दुर्घटना घडली.

पुंगे-री येथे असलेल्या अणू परीक्षणाच्या ठिकाणी उत्तर कोरियाने 3 सप्टेंबर रोजी आपली सहावी अणुचाचणी घेतली होती. ही चाचणी हायड्रोजन बॉंबची असल्याचा दावाही करण्यात आला असून, या चाचणीनंतर तेथे असलेल्या बोगद्याचा काही भाग कोसळून 100 कामगार अडकून पडले होते. त्यांची सुटका करण्यासाठी बचावकार्य सुरू असताना बोगद्याचा उर्वरित भागही कोसळला. त्याखाली 200 हून अधिक कामगार गाडले गेल्याची शक्‍यता जपानच्या माध्यमांनी उत्तर कोरियातील अधिकाऱ्यांच्या हवाल्याने वर्तविली आहे.

दरम्यान, ही चाचणी पार पडल्यानंतर उपग्रहाद्वारे टिपलेल्या छायाचित्रांद्वारे त्या ठिकाणी भूस्खलन झाल्याची माहिती समोर आली आहे. 38 नॉर्थ या संकेतस्थळाने ही छायाचित्रे प्रसिद्ध केली असून, पृष्ठभागावर झालेले बदल त्यात स्पष्टपणे दिसत आहेत.

तज्ज्ञांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष
ही अणुचाचणी घेणे धोकायदायक असून, ती घेतल्यास बोगद्यावर असलेला पर्वताचा भाग कोसळण्याची; तसेच स्फोटातून उत्सर्जित होणारी रेडिओऍक्‍टीव किरणे चिनी सीमारेषेनजीकच्या वातावरणात मिसळण्याचीही शक्‍यता आहे, असा इशारा तज्ज्ञांनी दिला होता. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट झाले.

चाचणीमुळे भूकंपाचे धक्के
या चाचणीनंतर काही मिनिटांनीच 6.3 रिश्‍टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. त्यापाठोपाठ काही क्षणात 4.1 रिश्‍टर स्केलचा दुसरा धक्का जाणावला, अशी माहिती अमेरिकेच्या भूगर्भीय सर्वेक्षण संस्थेने दिली आहे.