अमेरिकेने "एक चीन' धोरण कायम का ठेवावे: ट्रम्प

वृत्तसंस्था
सोमवार, 12 डिसेंबर 2016

चीनकडून चलनाच्या प्रश्‍नासहित उत्तर कोरिया, दक्षिण चिनी समुद्रामधील सागरी सीमारेषेच्या वादासंदर्भात अमेरिकेस सहकार्य केले जात नाही. चीनकडून व्यापार व इतर मुद्यांसंदर्भात सवलती मिळत नसतील, तर अमेरिकेकडून एक चीन धोरण कायम ठेवले जाण्याची आवश्‍यकता काय आहे?

वॉशिंग्टन - अमेरिकेच्या चीनसंदर्भातील धोरणामध्ये निर्णायक बदल करण्याचे संकेत अमेरिकेचे होणारे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहे. अमेरिकेने "एक चीन' (चीन व तैवान) धोरण कायम ठेवण्याची आवश्‍यकता आहे काय, असा प्रश्‍न ट्रम्प यांनी उपस्थित केला आहे.

तैवान हा चीनचाच भाग असल्याच्या चीनच्या दाव्याचा अमेरिकेने 1979 पासून राजनैतिक आदर ठेवला आहे. मात्र चीनकडून व्यापार आणि इतर मुद्यांसंदर्भात सवलती मिळत नसताना अमेरिकेकडून हे धोरण राबविले जाण्याची आवश्‍यकता आहे काय, असे मत ट्रम्प यांनी या व्यक्त केले आहे.

ट्रम्प यांनी नुकतीच तैवानचे राष्ट्राध्यक्ष त्साई इंग-वेन यांच्याशी दुरध्वनीवर चर्चा केल्याने चीनकडून अत्यंत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली होती. यानंतर ट्रम्प यांच्याकडून ट्‌विटरच्या माध्यमामधून चीनवर जोरदार टीका करण्यात आली होती. या संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवरच ट्रम्प यांनी हे नवे मत व्यक्त केले आहे.

"चीनकडून व्यापार व इतर मुद्यांसंदर्भात सवलती मिळत नसतील, तर अमेरिकेकडून एक चीन धोरण कायम ठेवले जाण्याची आवश्‍यकता काय आहे? चीनकडून चलनाच्या प्रश्‍नासहित उत्तर कोरिया, दक्षिण चिनी समुद्रामधील सागरी सीमारेषेच्या वादासंदर्भात अमेरिकेस सहकार्य केले जात नाही,'' असे ट्रम्प यांनी एका मुलाखतीदरम्यान बोलताना सांगितले.

गेल्या काही दशकांत अमेरिकेच्या कोणत्याही राष्ट्राध्यक्षाने तैवानच्या नेत्याशी चर्चा केलेली नाही. किंबहुना, चीनमध्ये दूतावास सुरु करण्यासाठी तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांना 1979 मध्ये तैवानशी असलेले राजनैतिक संबंध तोडून टाकावे लागले होते. तेव्हापासून "एक चीन' तत्त्वास अमेरिकेने दिलेली मान्यता हा अमेरिका-चीन संबंधाचा पाया ठरला आहे. या पार्श्‍वभूमीवर, अमेरिकेचे होणारे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी मांडलेली ही नवी भूमिका राजनैतिकदृष्टया अत्यंत संवेदनशील ठरु शकते.