उत्तर कोरियाचा डाव यशस्वी होणार नाही 

पीटीआय
बुधवार, 4 जानेवारी 2017

किम जोंग उन यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताताना ट्रम्प यांनी ट्‌विट करत अमेरिकी जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते आहे. उत्तर कोरियाला अण्विक कार्यक्रमापासून परावृत्त करण्यासाठी चीनकडून आवश्‍यक ती मदत अमेरिकेला केली जात नाही, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे

वॉशिंग्टन - अमेरिकेपर्यंत पोचू शकेल ऐवढ्या क्षमतेच्या आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची उत्तर कोरियाकडून चाचणी घेण्यात येणार नाही, असे आश्वासन देत अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकी जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची उत्तर कोरियाकडून लवकरच चाचणी करण्यात येणार असून, त्यासाठीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे, असे वक्तव्य उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांनी केले होते. किम जोंग उन यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताताना ट्रम्प यांनी ट्‌विट करत अमेरिकी जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते आहे. उत्तर कोरियाला अण्विक कार्यक्रमापासून परावृत्त करण्यासाठी चीनकडून आवश्‍यक ती मदत अमेरिकेला केली जात नाही, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांनी उत्तर कोरियाच्या क्षमतेवर शंका उपस्थित केली आहे किंवा असे करण्यापासून ते उत्तर कोरियाला रोखणार आहेत, हे अद्याप उघड झालेले नाही.

दरम्यान, ट्रम्प यांनी केलेल्या विधानावरून उत्तर कोरियाबाबत ते गंभीर आहेत असे दिसून येते, अशी प्रतिक्रिया दक्षिण कोरियाने आज व्यक्त केली. उत्तर कोरियाचा इशारा गंभीरपणे घेऊन त्याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे, असे दक्षिण कोरियाने स्पष्ट केले आहे.