फेसबुकवरच्या आरोपात तथ्य नाही: झुकेरबर्ग

वृत्तसंस्था
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

"दररोज नागरिकांना एकत्र आणण्याचे आणि सर्वांसाठी कम्युनिटी तयार करण्याचे काम करतो. सर्वांना आपले मत मांडता यावे, अशी आमची इच्छा आहे. अशा प्रकारचे व्यासपीठ तयार व्हावे, की ज्या ठिकाणी आपले मत मांडण्याचे स्वातंत्र्य असावे.''
- मार्क झुकेरबर्ग, फेसबुक संस्थापक

ट्रम्प यांच्या टीकेला झुकेरबर्ग यांचे उत्तर

वॉशिंग्टन: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेसबुकवर टीका केल्याने नाराज झालेले फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी ट्रम्प यांचे आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. ट्रम्प यांनी केलेल्या आरोपांत तथ्य नसल्याचे सांगत मतदानाचा आकडा वाढवण्यास फेसबुक उपयुक्त ठरले असल्याचे झुकेरबर्ग यांनी म्हटले आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच फेसबुकवर "अँटी ट्रम्प' असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर फेसबुकवर पोस्ट करत झुकेरबर्ग यांनी ट्रम्प यांच्या आरोपांना उत्तर दिले आहे. पोस्टमध्ये म्हटले, की 2016 च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत इंटरनेट हे मतदारांशी संपर्क साधण्याचे प्रमुख साधन होते. याशिवाय अन्य उमेदवारांची पात्रता जाणून घेण्यासाठीदेखील फेसबुक सर्वाधिक चांगले माध्यम होते. रशियाच्या एजंटने फेसबुकवर जाहिरात खरेदी केली होती आणि अमेरिकी अध्यक्षांच्या निवडणुकीपूर्वीही राजकीय तणाव निर्माण करण्यासाठी बोगस खाते उघडल्याचे त्यांनी म्हटले आहे. फेसबुकवर चुकीची माहिती प्रसारित झाल्याचा परिणाम निकालावर झाल्याचे वृत्तही झुकेरबर्ग यांनी खोडून काढले आहे. असा विचार करणे म्हणजे वेडेपणाचे लक्षण असल्याचे त्यांनी म्हटले आहे. फेसबुकने सुमारे 20 लाख नागरिकांना मतदान करण्यासाठी प्रेरित केले. फेसबुकवर "गेट आउट द व्होट' नावाची मोहीम सुरू केली होती. या मोहिमेमुळे वीस लाख नागरिकांनी मतदान केल्याचे म्हटले आहे. तसे पाहिले तर ट्रम्प आणि क्‍लिंटन यांच्या प्रचार अभियानापेक्षा फेसबुकचे अभियान सरस ठरले आहे. ही एक मोठी कामगिरी असल्याचे झुकेरबर्ग यांनी म्हटले आहे.

ट्रम्प यांचे ट्विट
ट्रम्प यांनी ट्‌विटरवर म्हटले, की फेसबुक नेहमीच अँटी ट्रम्प राहिलेले आहे. फेसबुकचे नेटवर्क अँटी ट्रम्प दिसून येते. अशाच पद्धतीने न्यूयॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्टसुद्धा ट्रम्पविरोधात राहिले आहे. ही काय मिलीभगत आहे का? मात्र येथील नागरिक प्रो ट्रम्प आहेत. आम्ही नऊ महिन्यांपूर्वी जे काही मिळवले आहे, ते व्हर्च्युअली कोणत्याही अध्यक्षाने मिळवलेले नाही. अर्थव्यवस्थेत तेजी दिसून येत आहे.

Web Title: washington news Factsheet on Facebook is not a fact: Zuckerberg