उत्तर कोरिया पुन्हा चाचणी घेण्याची शक्‍यता

वृत्तसंस्था
बुधवार, 26 जुलै 2017

वॉशिंग्टन: उत्तर कोरिया सतत क्षेपणास्त्र चाचणी घेत असल्याने तणावात दिवसेंदिवस भर पडत आहे. अमेरिकेच्या गुप्तचर खात्याने दिलेल्या माहितीनुसार उत्तर कोरिया 27 जुलै रोजी लष्कराच्या विजय दिवसानिमित्त आणखी एका आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेऊ शकतो.

27 जुलैला उत्तर कोरियात विजय दिवस साजरा केला जातो. याच दिवशी ऐतिहासिक कोरिया युद्ध संपले होते. या युद्धात मिळालेल्या विजयानिमित्त उत्तर कोरियात विजय दिवस साजरा केला जातो. गुरुवारी युद्धातील विजयास 64 वर्षे पूर्ण होत आहेत. दक्षिण कोरियातील वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार उत्तर कोरियाच्या प्यॉंगयॉंग प्रांतात आयसीबीएम (आंतरखंडीय बॅलेस्टिक मिसाईल) चाचणी उपकरण घेऊन जाणारे वाहन दिसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे गुरुवारी क्षेपणास्त्र चाचणी होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. 2014 मध्ये उत्तर कोरियाने 26 जुलै रोजी स्कड बी क्षेपणास्त्राची चाचणी घेऊन विजय दिवस साजरा केला होता. दरम्यान, काही दिवसांपूर्वी उत्तर कोरियाने आयसीबीएमची यशस्वी चाचणी केली होती. या चाचणीनंतर अमेरिकी संरक्षण तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेच्या अलास्का राज्यापर्यंत या क्षेपणास्त्राची क्षमता आहे.