कॅलिफोर्नियातील मृतांची संख्या 17 वर

वृत्तसंस्था
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

सोनोमा कौंटीत आगीमुळे सुमारे 10 जण मृत्युमुखी पडल्याचे सांगितले जात आहे. मेडोकिनो कौंटीत तीन, नापा कौंटीत दोन आणि यूबा कौंटीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे

सांता रोसा  - कॅलिफोर्नियातील जंगलात लागलेल्या आगीमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या 17 झाली आहे. या आगीमुळे शेकडो घरे बेचिराख झाली असून, बेघर नागरिकांनी परिसरात आश्रय घेतला आहे. सोनोमा कौंटीत सुमारे 1 लाख 75 हजार लोकसंख्या असणाऱ्या सांता रोसाला सर्वाधिक फटका बसल्याचे सांगितले जात आहे.

अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅलिफोर्नियातील आगीला आपत्कालीन स्थिती जाहीर केली आहे. तसेच पश्‍चिम राज्यात 17 ठिकाणी लागलेल्या आगीचा मुकाबला करण्यासाठी आर्थिक मदतीची आणि मनुष्यबळाची मदत देण्याची घोषणा केली आहे. गव्हर्नर जेरी ब्राऊन यांनी आठ कौंटीत आपत्कालीन स्थिती जाहीर केली आहे.

आग विझवण्यासाठी शेकडो बंब तैनात करण्यात आल्याची त्यांनी माहिती दिली. सोनोमा कौंटीत आगीमुळे सुमारे 10 जण मृत्युमुखी पडल्याचे सांगितले जात आहे. मेडोकिनो कौंटीत तीन, नापा कौंटीत दोन आणि यूबा कौंटीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. तसेच दोन हजार घरे खाक झाली असून, कोट्यवधीच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे.