चाळीसगावला नगरसेवक वाढणार

इच्छुकांची तयारी; काही विद्यमान नगरसेवकांबद्दल तीव्र नाराजी
State Election Commission Ward formation program announced Chalisgaon corporators
State Election Commission Ward formation program announced Chalisgaon corporatorssakal

चाळीसगाव : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील निवडणुका होणाऱ्या नगरपालिकांच्या प्रभागरचनेचा कार्यक्रम जाहीर केला असून, यंदाही एका प्रभागातून दोन सदस्य निवडून द्यावे लागणार आहेत. लोकसंख्येच्या निकषानुसार शहरात एक प्रभाग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नगरसेवकांची संख्या आता ३४ वरून ३६ होऊ शकते. पालिकेच्या अंतिम प्रभागरचनेला १ एप्रिलला मान्यता मिळणार असून, ५ एप्रिलला अंतिम रचना जाहीर होईल.

त्यानंतर प्रभागांसंदर्भातील चित्र स्पष्ट होईल. सध्या रस्त्यासह इतर विविध नागरी समस्यांच्या पार्श्वभूमीवर काही विद्यमान नगरसेवकांबद्दल नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. जवळपास सर्वच प्रभागांमध्ये नव्याने निवडणूक लढविण्यासाठी अनेकांची तयारी सुरू आहे. त्यामुळे पालिकेची यंदाची निवडणूक चांगलीच रंगणार असल्याचे दिसून येत आहे. येथील नगरपालिका ‘ब’ वर्गात असून, २७ नोव्हेंबर २०१६ ला पालिकेची निवडणूक झाली होती. तर २९ डिसेंबर २०२१ ला पालिकेची मुदत संपली. आता निवडणूक आयोगाने प्रभागरचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. प्रभागांच्या सीमा दर्शविणारी प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध करणे, हरकती व सूचना मागवणे व त्यावर सुनावणी घेणे, असा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

प्रारूप रचनेबाबत रहिवाशांच्या हरकती, सूचना मागविण्यासाठी १० ते १७ मार्चचा कालावधी राहणार आहे. त्यावर २२ मार्चला जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी होईल. त्यानंतर २५ मार्चपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडून राज्य निवडणूक आयोगाकडे अहवाल सादर केला जाईल. १ एप्रिलला राज्य निवडणूक आयुक्त अंतिम प्रभागरचनेला मान्यता देतील. ५ एप्रिलला अंतिम प्रभागरचना जिल्हाधिकारी जाहीर करतील. त्यानंतर प्रभागनिहाय आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर होईल. एकूणच या सर्व प्रक्रियेचा कालावधी पाहता, मे महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे. यंदाच्या निवडणुकीसाठी २०११ च्या जनगणनेची आकडेवारी ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यामुळे शहराची वाढती लोकसंख्या पाहता, यावेळी दोन नगरसेवकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

नगरसेवकांबद्दल नाराजी

चाळीसगाव नगरपालिकेत सत्तांतर झाल्यानंतर शहरवासीयांना नागरी समस्या सुटतील, अशी अपेक्षा होती. मात्र, बहुसंख्य प्रभागातील रस्ते, गटारी, स्वच्छता, पाणीपुरवठा, दिवाबत्ती यासारखे छोटे छोटे प्रश्‍न अजूनही सुटलेले नाहीत. पालिकेतर्फे राबवल्या जाणार्या अनेक योजनांमध्ये नगरसेवकांनी टक्केवारी घेतल्याची चर्चा नागरिक खुलेआम करतात. यात कोणाचे कोणी नाव घेत नसले तरी बहुसंख्य विद्यमान नगरसेवकांबद्दल प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. पालिकेच्या सभागृहात नवीन चेहरे पाठवा, अशी मागणी नागरिकांमधून विविध व्हॉट्सॲप ग्रुपवर होणार्या चर्चेदरम्यान केली जात आहे. या संधीचा फायदा घेत, काही इच्छूक जोरदार तयारीला लागले आहेत.

२०१६ च्या निवडणुकीतील आरक्षणाचे चित्र

  • नागरिकांचा मागास प्रवर्ग ०४

  • नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ०५

  • सर्वसाधारण ०९

  • सर्वसाधारण महिला १०

  • अनुसूचित जाती ०२

  • अनुसूचित जाती महिला ०३

  • अनुसूचित जमाती महिला ०१

  • एकूण ३४

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com