निराधार, भिक्षेकरी झाले चकाचक : गणेश मंडळाचा अनोखा उपक्रम

तुषार पाटील
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

येथील तरुण कार्यकर्त्यांनी सकारात्मकता दाखवत त्यांच्याबद्दल जवळीक दाखवत आवर्जून त्यांच्यासोबत सेल्फी घेऊन सोशल साईटवर शेअर केले. त्यांना नाश्ता दिला. 

भोकरदन (जालना) : शहरातील देशमुख गल्लीतील छत्रपती शिवाजी गणेश मंडळातर्फे गणेशोत्सवानिमित्त (ता. ३१) गुरुवारी एका अनोख्या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. मानसिक संतुलन ढळल्याने शहरात भरकटलेले जवळपास दहा ते बारा व्यक्ती, निराधार, अपंग, भिकारी वयोवृद्ध यांना शहरातील एक जागी एकत्र आणले. त्यांना अंघोळ घालण्यात आली, त्यांचे केशकर्तन, दाढी करून त्यांना नवीन कपडे देऊन तयार करण्यात आले. विवस्त्र अवस्थेत असणारे वेडसर लोक गोळा करून आणणेदेखील जिकिरीचे काम होते. त्यांच्याशी संवाद साधणे देखील अवघड. परंतु, छत्रपती शिवाजी मंडळाच्या युवकांनी हे प्रयत्नपूर्वक करून दाखवले. 

त्या निराधार लोकांना स्वच्छ तयार केलेच, शिवाय साबण, तेल, कंगवा, पावडर आदी साहित्य देखील देण्यात आले. यानंतर येथील तरुण कार्यकर्त्यांनी सकारात्मकता दाखवत त्यांच्याबद्दल जवळीक दाखवत आवर्जून त्यांच्यासोबत सेल्फी घेऊन सोशल साईटवर शेअर केले. त्यांना नाश्ता दिला. 

यावेळी मंडळाचे अध्यक्ष वैभव देशमुख, उपाध्यक्ष गौरव देशमुख, रोशन देशमुख, प्रतीक देशमुख, पप्पू देशमुख, अमोल देशमुख, विश्वजित देशमुख, राहुल देशमुख, विकास जाधव, विक्रम देशमुख, प्रीतम देशमुख, रंजित देशमुख, समीर जाधव, मंदार पवार, सचिन देशमुख, निखिल देशमुख आदी उपस्थित होते.

विशेष म्हणजे शहरातील ज्या ठिकाणी हे मानसिकदृष्ट्या आजारी असणारे काहीजण बेवारस पहुडलेले असतात. त्यांना हव्या त्या ठिकाणी पुन्हा सोडून देण्यात आले व परिसरातील नागरिकांना सांगण्यात आले की यांच्याकडे माणुसकीच्या नजरेने बघावे, तसेच सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले. मंडळाच्या या उपक्रमाला इम्रान कुरेशी व अमजद शेख या मुस्लिम तरुणांनी विशेष सहकार्य केले.

 

फोटो गॅलरी